गुगल अ‍ॅपवर नोंद : चिपळूण पालिकेचे पथक पोहचले 9 हजार 470 लोकापर्यंत..

.मुझफ्फर खान | Thursday, 23 July 2020

 सर्वेक्षणासाठी 13 पथके तयार करण्यात आली आहेत.

चिपळूण (रत्नागिरी) :  शहरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पालिकेच्या माध्यमातून घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या सर्वेक्षणासाठी 13 पथके तयार करण्यात आली आहे. ही पथके तीन दिवसात 9 हजार 470 लोकापर्यंत पोहचली आहेत. या सर्वेची नोंद गुगल अ‍ॅपवरही होत आहे. आणखी काही दिवस ही मोहीम चालणार आहे.

मार्च महिन्यापासून सुरू झालेल्या कोरोनाच्या संकटावर सुरूवातीला शहराने चांगली मात केली होती. काही दिवस मागे जाता कोरोनामुक्त असलेल्या शहरात आता वेगाने प्रादुर्भाव होत असल्याचे दिसत आहे. शहरातील विविध भागातील 155 जणांना आतापर्यंत कोरोना झाला असून त्यातील 83 जण बरे झाले आहेत, तर 69 जणांवर कामथे रूग्णालय, पेढांबे येथील कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. तिघांचा मृत्यू झाला असून 88जण होमक्वॉरंटाईन आहेत. शहरात 39 कटेनमेन्ट झोन आहेत. त्यामुळे शहरातील साखळी तोडण्याबरोबरच रूग्ण संख्येला आळा घालण्यासाठी काही दिवसांपूर्वी शासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी यांची बैठक झाली. 

हेही वाचा- सुस्कारा : आ वैभव नाईक यांच्या संपर्कात आलेल्या अधिकाऱ्यांचे अहवाल निगेटिव्ह..कोणाचे वाचा- -

बैठकीत शहरात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मुख्याधिकारी डॉ. विधाते, तालुका आरोग्याधिकारी डॉ. ज्योती यादव यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य कर्मचारी, आशा, पालिका कर्मचारी यांची 13 प्रभागांसाठी 13 पथके तयार करण्यात आली असून त्याचे प्रमुखपद प्रभागातील नगरसेवकांना देण्यात आले आहे. या पथकातील प्रत्येकाला सुरक्षिततेचा उपाय म्हणून एन-95चे दोन मास्क, सॅनिटायझर, हॅण्डग्लोज, फेसशिल्ड, हॅन्डबॅग आदी साहित्य देण्यात आले आहे. सर्वेक्षणासाठी महत्वाचे असलेले 12 नॉन कॉन्टॅक्ट इन्फ्रारेड थर्मोमेटर्स व 15 ऑक्सो मीटर आमदार शेखर निकम यांनी स्वखर्चातून पालिकेला दिले आहेत. त्याचा मोठा फायदा होत आहे.

हेही वाचा-लॉकडाऊनचा सदुपयोग -  ‘मूकबधिर’चे माजी विद्यार्थी आत्मनिर्भर -

ही पथके सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत घराघरात जाऊन कोणाला ताप येत आहे का, ऑक्सिजन पातळी किती आहे, 55 वर्षावरील व्यक्ती किती आहेत, कोणाला गंभीर आजार आहेत, याची माहिती घेत असून त्यांना आर्सेनिक अल्बम-30च्या गोळ्याया देत आहेत. या सर्वेची नोंद महसूल विभागाकडून दिलेल्या गुगल अ‍ॅपवर होत आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी सर्व माहिती मिळणे शक्य होणार आहे. 

हेही वाचा-माणुसकी धर्मापलीकडे : रिपोर्ट निगेटिव्ह अंत्यसंस्कार करण्यास कुटुंबीयांनी दिला नकार ,  शेवटी मुस्लिम बांधवांनी केला अंत्यविधी... -

पालिकेचे हे पथक 2360 कुटूंबापर्यंत पोहचले. यातील 9 हजार 470 लोकांची तपासणी करण्यात आली. केवळ 11 लोकांमध्ये तापाची लक्षणे आढळली. यापुढे काही दिवस हे सर्वेक्षण सुरू राहणार आहे. त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, 

प्रमोद ठसाळे, प्रशासकीय अधिकारी चिपळूण पालिका

संपादन - अर्चना बनगे