...तरीही सिंधुदुर्गात अशी खबरदारी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 एप्रिल 2020

आरोग्य दिनाचे औचित्य साधून जिल्हा प्रशासनाने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टंसिंगचे पालन नागरिकांनी करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

ओरोस (सिंधुदुर्ग) - कोरोना विषाणूच्या तपासणीसाठी पाठविण्यात आलेले चारही नमुने अहवाल प्राप्त झाले असून सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत एकूण 66 अहवाल पाठविण्यात आले होते. त्यातील एक नमुना पॉझिटिव्ह आला होता. बाकी सर्व नमुने निगेटिव्ह आले आहेत. 
दरम्यान, जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात नव्याने 25 खाटा तयार केल्या आहेत. त्यामुळे आयसोलेशनसाठी एकूण 100 खाटा तयार आहेत. 

जिल्ह्यात 358 व्यक्तींना घरीच क्वारंटाईन केले असून 53 व्यक्ती या संस्थात्मक आयसोलेशन कक्षांमध्ये आहेत. आयसोलेशन कक्षामध्ये 15 व्यक्ती दाखल असून 85 व्यक्तींचे 28 दिवसांचे क्वारंटाईन पूर्ण झाले आहे.  आरोग्य यंत्रणेमार्फत आज एकूण 2191 व्यक्तींची तपासणी केली आहे. जिल्हा रुग्णालयाने आतापर्यंत 66 नमुने तपासणीसाठी पाठविले असून त्यातील 65 नमुन्यांचा अहवाल हा निगेटिव्ह आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय येथील आयसोलेशन कक्षामध्ये आणखी 25 खाटांची सुविधा निर्माण करण्यात आली असून आता या विलगीकरण कक्षामध्ये 100 खाटांची सुविधा उपलब्ध झाली आहे. 

जागतिक आरोग्य दिनानिमित्त जिल्ह्यातील सर्व डॉक्‍टर्स, नर्सेस, आरोग्य यंत्रणेतील कर्मचारी, आरोग्य सेवक तसेच जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याचा सर्व्हे करणाऱ्या आशा वर्कर्स, एएनएम व एमपीडब्लू, विशेषतः जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड - 19 वॉर्डमध्ये सेवा बजावत असलेले डॉक्‍टर्स, नर्सेस, आरोग्य सेविका-सेवक हे कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी सदैव कार्यरत आहेत, स्वतःच्या जीवाची चिंता न करता सदैव कार्यतत्पर असणाऱ्या व कोरोनाशी दोन हात करणाऱ्या सर्व डॉक्‍टर्स व कर्मचारी यांचे जिल्हा प्रशासन व जिल्हावासीयांनी आभार मानले आहेत. तर जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून जिल्हा प्रशासनाने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टंसिंगचे पालन नागरिकांनी करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

दहा ठिकाणी शिवभोजन केंद्र 
लॉक डाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या मजूर, कामगार आणि बेघर यांच्यासाठी 15 ठिकाणी कॅम्प उभारले असून त्या ठिकाणी 558 व्यक्तींची राहण्याची व जेवणाची सोय आहे. जिल्ह्यात एकूण 10 ठिकाणी शिवभोजन केंद्र स्थापन करण्यात आले असून या माध्यमातून बेघर आणि मजूर कॅम्पमधील लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus impact konkan sindhudurg