सावंतवाडीत कशाची भीती? प्रशासनही झालेय सतर्क..वाचा सविस्तर

भूषण आरोसकर | Wednesday, 29 July 2020

चाकरमान्यांना गावात येण्यासाठी सुरुवातीला मतभिन्नता दिसून येत होती. आज तालुक्‍यामध्ये मुंबई, पुणे येथून येणारे चाकरमानी वगळता आता स्थानिकही कोरोना पॉझिटीव्ह आढळून येत आहेत.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - तालुक्‍यात गेल्या काही दिवसात क्वारंटाईन नसलेल्या ग्रामीण व शहरी भागातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता या रूग्णामुळे तालुक्‍यात रूग्णसंख्या आणखी वाढण्याची भीती तालुकासीयांकडून व्यक्त होत आहे. प्रशासनाने याबाबत अधिक सतर्क होणे आवश्‍यक आहे. 

तालुक्‍यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या 61 वर गेली आहे. या पार्श्‍वभूमीवर सात ठिकाणी कंन्टेमेंट झोन जाहीर केला आहे. सुरूवातीला मुंबई-पुण्यातील येणाऱ्या चाकरमान्यांकडून कोरोनाचा प्रादुर्भाव होत होता. त्यामुळे मुंबई-पुणेकरांबाबत लोकांच्या मनात भीतीची भावना होती. त्यामुळे चाकरमान्यांना गावात येण्यासाठी सुरुवातीला मतभिन्नता दिसून येत होती. आज तालुक्‍यामध्ये मुंबई, पुणे येथून येणारे चाकरमानी वगळता आता स्थानिकही कोरोना पॉझिटीव्ह आढळून येत आहेत.

प्रशासनाने मुंबई, पुणे आदी भागातून येणाऱ्या चाकरमान्यांना संस्थात्मक तसेच होम क्वारंटाईन आदी उपाययोजना राबवून तालुक्‍यात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी चांगली कामगिरी राबविली होती; मात्र सध्याची स्थिती लक्षात घेता क्वारंटाईन नसलेले ग्रामीण तसेच शहरी भागातील काहीजण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने आणि त्या व्यक्ती सगळीकडे फिरल्याने तालुक्‍यात रूग्ण वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

आज सावंतवाडी शहरासह तालुक्‍यातील महत्वाच्या सगळ्याच छोट्या मोठ्या बाजारपेठेत लोकांची मोठी गर्दी असते. शासनाने घालुन दिलेल्या नियमाचे उल्लंघन याठिकाणी केले जाते. त्यामुळे कोरोनाचा धोका अधिक होण्याची भीती व्यक्त होत आहे. बांद्यालगत असलेल्या एका मोठ्या कंपनीमध्ये एका कामगाराला आठ दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्याच्या संपर्कातील इतर कामगारांचे ही स्वॅब घेण्यात आले होते. त्यातील मळगाव व इन्सुली येथील दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले; मात्र ते मधल्या काळात क्वारटांईन नसल्याने त्यांच्या संपर्कातील लोकांनाही धोका निर्माण झाला आहे.

आतापर्यंत स्थानिक पॉझिटिव रुग्णांच्या संपर्कात आलेल्या यांचा सर्वे आरोग्य प्रशासनाकडून सुरू आहे. या सर्व व लोकांचा स्वॅब घेण्यात येणार आहे; मात्र तरीही अशा पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःहून पुढे यावे, असे आवाहनही प्रशासनाकडून होत आहे. सावंतवाडी शहरामध्ये पॉझिटिव्ह आढळलेले दाम्पत्य अनेक जणांच्या संपर्कात आले होते. त्यामुळे पालिका प्रशासनाने शहर काही दिवसासाठी लॉकडाऊन करणे अपेक्षित होते; मात्र सणासुदीचे दिवस लक्षात घेता प्रशासनाकडून ही गोष्ट टाळण्यात आली; मात्र त्यामुळे रूग्ण वाढण्याचा धोका अधिक आहे. 

कोरोनाबाधित रुग्ण अन्‌ सर्व्हे 
सावंतवाडी शहरात चितारआळी भागात आढळलेले कोरोना रुग्णासहीत, मळगाव, कारिवडे, बांदा, इन्सुली, चराठा आदी भागातील रुग्ण स्थानिक आहेत. शिवाय हे रुग्ण पॉझिटिव्ह ठरण्याआधी बऱ्याच ठिकाणी फिरले आहेत. शहरात पॉझिटिव्ह आढळलेला रुग्ण हा मुंबई, ठाणे येथून जावुन आला होता. त्यानंतर तो पॉझिटिव्ह आला; मात्र मधल्या काळात तो अनेकांच्या संपर्कात आल्याने त्याच्याकडून अनेकांना धोका होता; मात्र आतापर्यंत सातजण त्याच्या संपर्कातील पॉझिटिव्ह आले आहेत. ते सात जण अजुन कोणाच्या संपर्कात आले याबाबत सर्व्हे सुरू आहे.  

संपादन - राहुल पाटील