सावंतवाडीला कोरोनाची घट्ट मिठी 

रूपेश हिराप
Tuesday, 15 September 2020

जिल्ह्याचा विचार करता आता गावा-गावामध्ये रुग्ण दगावत चालले आहेत. यात सावंतवाडी शहरही आता मागे नाही. शहरातील आत्तापर्यंत सात जणांचा कोरोनाने बळी गेला आहे.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - शहरातील कोरोना रुग्णांची वाढणारी झपाट्याने संख्या व आजपर्यंत सात जणांचा गेलेला बळी लक्षात घेता, सावंतवाडीकरांनी आतातरी सावध होण्याची खरी गरज आहे. एक नागरिक म्हणून कोरोनाची वाढणारी साखळी रोखण्यासाठी सावंतवाडीकरांनी स्वतःला काही निर्बंध घालून घेणे गरजेचे बनले आहे. 

जिल्ह्याचा विचार करता आता गावा-गावामध्ये रुग्ण दगावत चालले आहेत. यात सावंतवाडी शहरही आता मागे नाही. शहरातील आत्तापर्यंत सात जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. रुग्ण संख्याही दिडशेच्या पार पोहोचली आहे. सामाजिक, राजकीय, डॉक्‍टर, सरकारी कर्मचारी बाधित झाले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता सावंतवाडीकरांनी सावध होणे गरजेचे आहे. सावंतवाडी पालिका विविध उपाययोजना राबवताना विशेष खबरदारीवर भर देत आहेच; मात्र तरीसुद्धा ज्या पद्धतीने नागरिकांवर लादण्यात आलेले नियम, व्यापारी वर्गासाठी बनवण्यात आलेले नियम याची कठोरात कठोर अंमलबजावणी शहरात पुन्हा एकदा होणे गरजेचे बनले आहे. 

लॉकडाऊन हा जरी कोरोनावरील उपाय नसला तरी पालिकेने आपल्या अखत्यारीत येणाऱ्या परिसरातील नागरिकांना नियमांचे पालन करणे भाग पाडले तर बऱ्याच अंशी कोरोनाची साखळी तुटू शकते. सुरुवातीचा विचार करता पालिका प्रशासनाच्या माध्यमातून नगराध्यक्ष परब यांनी आरोग्य विभागाकडून कोरोना रोखण्यासाठी चोख आणि योग्य नियोजन केले होते; मात्र अलिकडे यामध्ये काहीसे दुर्लक्ष झाल्याने आज त्याचा परिणाम समोर आला आहे. 

आजची परिस्थिती पाहता दुकांनाच्या बाहेर नेहमी गर्दी असते. बाजारपेठही नेहमी गजबजलेली असते. मच्छी मार्केटमध्ये तर सोशल डिस्टनचेही पालनच केले जात नाही. येथे पालिकेचे पुर्णतः दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते; मात्र आवरायचे कोणाला? हा प्रश्‍न मात्र नेहमीच प्रशासनासमोर राहीला आहे. प्रत्येकाने स्वतःला नियम घालून कामापुरते घराबाहेर पडल्यास तसेच दुकानदारांनीही सोशल डिस्टनचे पालन करत ते करण्यास ग्राहकांना भाग पाडल्यास कोरोनावर आपण नक्कीच मात करु शकतो. 

शहरातील स्थिती अशी 
पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 160 
बरे झालेल्यांमध्ये 97 
सक्रिय असलेले रुग्ण 58 
होम आयसोलेशनमध्ये 15 
कंटेन्मेंट झोन 47 
आतापर्यंत मृत्यू 7 
मृत्यूत व्यापारी 2 
 

शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आरोग्य विभागाच्या माध्यमातून प्रयत्न होतील. यामध्ये जंतुनाशक फवारणीसह इतर आवश्‍यक बाबींचा विचार केला जाणार आहे. सोशल डिस्टन्स व मास्क न वापरण्यांवर पुन्हा कडक कारवाई होईल. व्यापारी वर्गानेही नियम पाळावेत. लॉकडाउनचा सध्यातरी विचार नाही. 
- संजू परब, नगराध्यक्ष, सावंतवाडी 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus impact sindhudurg district