चिंताजनक! शेकडो टन कलिंगडांचे करायचे काय?

coronavirus impact watermelon konkan sindhudurg
coronavirus impact watermelon konkan sindhudurg

वैभववाडी (सिंधुदुर्ग) -  "कोरोना'मुळे शेतात परिपक्‍व झालेले जिल्ह्यातील विविध गावातील शेकडो टन कलिंगड पीक संकटात सापडले आहे. शेतातच माल सडत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. प्रशासनाने शेतमाल विक्रीसाठी पास देण्यास सुरूवात केली असली तरी व्यापारी माल उचलण्यास तयार नाहीत. बाजारपेठांमध्ये लोकच नसतील तर माल घेऊन करायचे काय? असा प्रश्‍न व्यापाऱ्यांसमोर आहे. त्यामुळे कलिंगड पिकावर अर्थकारण चालणाऱ्या गावांचे अर्थकारण कोलमडणार आहे. 

जिल्ह्यात गेल्या काही वर्षात कलिंगड पिकाने अनेक शेतकऱ्यांना आधार दिला. जिल्ह्यानजीक असलेल्या गोव्यातील पर्यटनामुळे तेथे जिल्ह्यातील कलिंगडला मोठी मागणी आहे. पावसाळा संपला की नोव्हेंबरपासून कलिंगड लागवडीला जिल्ह्यात सुरू होते. साधारणपणे जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जिल्हयातून कलिंगड उत्पादन सुरू होते. जिल्ह्यातील माल स्थानिक पातळीवर विक्री केला जातोच; परंतु त्याहीपेक्षा गोव्यात कलिंगडला मोठी मागणी असते. गोवा, बांदा येथील अनेक व्यापारी शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन कलिंगड खरेदी करतात. जिल्ह्यात हजारो एकरवर कलिंगड लागवड केली जाते. व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार टप्प्पा-टप्प्याने ही लागवड शेतकरी करीत असतो. 

या वर्षी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यांपासून मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कलिंगडला साधारणपणे 9 ते 10 रुपये होलसेलचा दर होता; परंतु मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव देशात वाढला. त्यामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला. त्याचा मोठी किंमत इतर क्षेत्राप्रमाणे शेतीक्षेत्राला देखील मोजावी लागत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात शेकडो टन माल परिपक्‍व झाला आहे. काहींचा संपूर्ण माल सडला आहे तर काही शेतकऱ्यांनी सुरूवातीला फक्त 20 ते 25 टन माल विकला उर्वरित दीडशे ते दोनशे टन माल अजूनही शेतातच आहे. शेतमाल विक्रीसाठी महसूल, कृषी विभागाकडून पास मिळतात; परंतु बाजारपेठेत ग्राहक नसल्यामुळे व्यापारी कलिंगड घेण्यासाठी पुढे येत नाहीत. अनेकांनी कर्जे काढून शेती केली आहे. त्यांच्या कर्ज परतफेडीचा प्रश्‍न निर्माण होणार आहे. 

कलिंगड, आंबा किंवा अन्य फळांच्या विक्री करण्यासाठी शासनाने पासची व्यवस्था केली आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कलिंगड तयार असून त्याची नासाडी होत आहे हे वास्तव आहे; परंतु ही समस्या सर्वच ठिकाणच्या विविध फळांच्या बाबतीत घडत आहे. जिल्ह्यातील नुकसानीचा अहवाल वरिष्ठांकडे देण्यात येईल. 
- एस. जी. बागल, जिल्हा कृषी अधीक्षक, सिंधुदुर्ग 

आठ एकरात कलिंगड शेती असून दीड एकरातील काढणी पूर्ण झाली आहे. सरासरी एकरी 25 ते 30 टन उत्पादन मिळाले; परंतु अजुन साधारणपणे 140 ते 150 टन उत्पादन मिळेल. आता 30 टन मालाची नासाडी झाली आहे. चार दिवसात 50 टन माल परिपक्‍व होईल. संचारबंदीमुळे माल खरेदी होणार नाही. त्यामुळे कलिंगडचे करायचे काय? 
- दीपक कासोटे, शेतकरी, गडमठ, वैभववाडी 

तीन एकरात कलिंगड शेती होती. मल्चिंग, ठिबक सिंचनचा वापर करून लागवड केली होती; परंतु उत्पादनाला सुरूवात होताच "कोरोना'चा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे एक दोन टन मालाचीच विक्री झाली. सध्या शेतात 60 टन माल आहे. साधारणपणे सहा ते सात लाखांचे नुकसान होणार आहे. 
- किरण रावराणे, आर्चिणे, वैभववाडी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com