साहब, कुछ भी करो; हमे घर भेजो 

एकनाथ पवार
शुक्रवार, 22 मे 2020

23 मार्चनंतर लॉकडाउन जाहीर करण्यात आले. त्यानंतर लॉकडुान कालावधीत जिल्ह्यातील इमारत बांधकामे रखडली. त्यामुळे महिन्याहून अधिक कालावधी उत्तरप्रदेशातील मजूर घरातच बसून होते.

वैभववाडी (सिंधुदुर्ग ) - आम्ही काम बंद केल्यावर पंधरा दिवस झाले आहेत. घरातील दाणागोठा संपला आहे. गावी जाण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करीत आहे. इतर शहरातील लोक गावात पोहोचल्यामुळे आमचे नातेवाईक चिंतेत आहेत. त्यांनी खाणेपिणे बंद केले आहे; परंतु आम्हाला जाण्यासाठी पास मिळत नाही. त्यामुळे बेचैन झालेले उत्तरप्रदेशातील हजारो मजूर भेटणाऱ्या लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांना, साहब हमारे लिए कुछ तो करो, कुछ भी करो और हमे गाडीमें बिठाके घर भेजो, अशी विनवणी करीत आहेत. 

उत्तरप्रदेशातील दोन हजारहून अधिक मजूर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत. प्लास्टर, लादी बसविणे यांसह विविध कामे करण्यासाठी पावसाळा संपल्यानंतर उत्तरप्रदेशातुन हजारो मजूर जिल्ह्यात येतात. एका पाठोपाठ एक मजुरांची टोळकी तालुक्‍याच्या ठिकाणी येऊन एकत्रितपणे राहतात. जिल्ह्यातील बांधकाम व्यवसायाची व्याप्ती वाढल्यामुळे जिल्हयात येणाऱ्या मंजुराची संख्या सुध्दा वर्षागणीक वाढत आहे. प्लास्टर आणि लादी बसविण्याच्या कामात तरबेज असणाऱ्या या कारागिरांवर बांधकाम व्यवसायाची मदार आहे. साधारणपणे नोव्हेंबर अखेर ते डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात हे लोक येतात. त्यानंतर जुनच्या पहिल्या आठवड्यापर्यत हे लोक काम करतात. सहा महिन्यात शेकडो इमारतीची कामे ते पूर्ण करतात. पावसाळ्यात काम करणे शक्‍य नसल्यामुळे 80 टक्के मजूर गावी जातात; 
परंतु या वर्षी मार्चच्या दुसऱ्या आठवड्यानंतर कोरोनाचे सावट ग्रामीण भागावर घोंघावू लागले. 23 मार्चनंतर लॉकडाउन जाहीर करण्यात आले. त्यानंतर लॉकडुान कालावधीत जिल्ह्यातील इमारत बांधकामे रखडली. त्यामुळे महिन्याहून अधिक कालावधी उत्तरप्रदेशातील मजूर घरातच बसून होते.

डिसेंबरपासून मिळविलेल्या पैशातून आतापर्यत या मजुरांना आपला खर्च कसाबसा भागविला. पंधरा वीस दिवसांपासून इमारत बांधकामांची कामे करण्यास परवानगी देखील मिळाली; परंतु कोरोनाच्या भीतीने मजूर काम करण्यास धजावत नाहीत. त्यांना आपल्या घरचे वेध लागले आहेत. गावी पोचता कसे येईल या एकाच विवंचनेत हे मजूर आहेत. मुंबई, पुण्यातील काही मजुर विविध वाहनांतून उत्तरप्रदेशात पोहोचले. त्यामुळे अडकलेल्या कामगारांचा जीव कासावीस होऊ लागला आहे. कर्नाटकमधील कामगार जातायत मग आम्हालाच ई-पास का मिळत नाही. सरकार आम्हालाच सोडत नाही असे प्रश्‍न त्यांना पडले आहेत. 

गेल्या काही दिवसांपासून हे मजूर तहसील कार्यालयाभोवती घिरट्या घालताना दिसत आहेत. ओळखीच्या लोकप्रतिनिधीना, अधिकाऱ्यांना "साहब कुछ भी करो हम लोग परेशानीमे है, कुछ भी करो और हमे गॉव भेजो, हमारे घरवाले परेशान है, कही लोगोंने खानापिना बंद कर दिया है' अशा शब्दात विनवणी करीत आहेत; परंतु त्यांच्याकडे कुणीही लक्ष देताना दिसत नाही. पाऊस सुरू झाला तर आम्हाला जाता येणार नाही. या चिंतेत हे मजूर आहेत. 

चालत जाण्याचीही 
मजुरांची मानसिकता 

उत्तरप्रदेशातील हजारो मजूर अक्षरक्षः कंटाळलेले आहेत. मिळेल त्या वाहनाने गावी जाण्यासाठी तयार आहेत. जर या मजुरांची व्यवस्था वेळेत केली गेली नाही तर हे मजूर चालत देखील जाऊ शकतात. तशा प्रकारची त्यांची मानसिकता बनत चालली आहे. 
 

""सिंधुदुर्ग जिल्ह्यात उत्तर प्रदेश, पश्‍चिम बंगाल व बिहारमधील नागरिक मोठ्या प्रमाणात अडकले आहेत. त्यांची आपल्या राज्यात जाण्यासाठी प्रशासनाकडे मागणी आहे. जिल्हा प्रशासनसुद्धा यासाठी तयार आहे; पण सबंधित राज्यांनी हिरवा कंदील दिलेला नाही. यामुळे आम्हाला त्यांच्या जाण्याचे नियोजन करता येत नाही. 
- के. मंजूलक्ष्मी, जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus impact workers konkan sindhudurg