esakal | व्यापाऱ्यांनो, कोरोनाचे नियम पाळा ः व्यापारी महासंघ
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus issue Federation Merchants press conference malvan konkan

. यात पर्यटकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष नितीन तायशेटे, माजी जिल्हाध्यक्ष नितीन वाळके यांनी पत्रकार परिषदेत केले. 

व्यापाऱ्यांनो, कोरोनाचे नियम पाळा ः व्यापारी महासंघ

sakal_logo
By
प्रशांत हिंदळेकर

मालवण (सिंधुदुर्ग) - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्‍यता असून पुन्हा होणारी टाळेबंदी टाळायची असेल तर शासनाने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर केलेल्या नियमांचे व्यापारी, व्यावसायिक, पर्यटकांनी काटेकोरपणे पालन करणे अत्यावश्‍यक आहे. येत्या काळात राज्याची खास तपासणी पथके येणार आहेत. या पथकाला परवाना निलंबित, दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार दिले आहेत. त्यामुळे व्यावसायिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करून व्यवसाय करावा. यात पर्यटकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष नितीन तायशेटे, माजी जिल्हाध्यक्ष नितीन वाळके यांनी पत्रकार परिषदेत केले. 

येथील हॉटेल चैतन्य येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी रवी तळाशिलकर, उमेश शिरोडकर, हर्षल बांदेकर, आगोस्तीन डिसोझा यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. श्री. वाळके म्हणाले, ""कोरोनाचे संकट अद्यापही दूर झालेले नाही. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्‍यता असून राज्यानेही त्यादृष्टीने कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. कोरोना महामारीच्या काळात व्यापारी महासंघाने सर्व सदस्यांनी जिल्ह्यात शासनाला, प्रशासनाला कोरोनावर नियंत्रण राखण्यासाठी चांगले सहकार्य केले आहे. आता दुसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशाचा फटका येथील व्यापाऱ्यांना, पर्यटकांना बसण्याची शक्‍यता आहे.

कारण येथील व्यावसायिकांचा जास्त संपर्क हा कोल्हापूरशी आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी चांगले प्रयत्न गेल्या काही महिन्यात झाले आहेत; मात्र येत्या काही दिवसात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून पूर्वीप्रमाणेच कडक कारवाई सुरू करण्याचे संकेत मिळत आहेत. मागील कोरोनाच्या काळात प्रसार रोखण्यासाठी व्यावसायिक, व्यापारी, उद्योजकांनी जशी काळजी घेतली तशीच काळजी येत्या काळात घेणे अत्यावश्‍यक बनले आहे. टाळेबंदी टाळायची असेल तर व्यापाऱ्यांनी अधिक काळजी घेणे महत्त्वाचे बनले आहे.'' 

...तर कठोर कारवाई शक्‍य 
हॉटेल्स, खानावळी, रेस्टॉरंट, बेकरी, उपहारगृहे, डिपार्टंमेंटल स्टोअर्समध्ये ग्राहकांची नियमित तपासणी, मास्क वापरणे, अनावश्‍यक गर्दी टाळण्यासाठी 50 टक्के उपस्थिती असे नियम आहेत. या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. कारण येत्या काळात राज्य शासनाच्या खास पथकांकडून तपासणी होणार आहे. या पथकांना काही अनियमितता दिसून आल्यास संबंधित व्यापाऱ्याच्या परवान्याचे निलंबन, दंडात्मक कारवाई होऊ शकते. स्थानिक पातळीवर यात कोणताही हस्तक्षेप होणार नाही, असे आवाहन तायशेटे यांनी केले. 

संपादन - राहुल पाटील