coronavirus issue press conference narayan rane konkan sindhudurg
coronavirus issue press conference narayan rane konkan sindhudurg

...हा सरकारचा राजकीय कोरोना : नारायण राणे

ओरोस (सिंधुदुर्ग) - अर्थसंकल्पीय अधिवेशन टाळण्यासाठी सरकार कोरोनाचा बाऊ करत आहे. सरकारविरोधी पक्षाला सामोरे जाऊ शकत नाही. हा राजकीय कोरोना आहे, असा आरोप भाजप नेते खासदार नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषदेत केला. 
ते म्हणाले, ""अधिवेशन सहा आठवडे घेण्याची राज्याची परंपरा आहे; परंतु महाविकास आघाडीला या अधिवेशनाला सामोरे जायचे नाही. त्यामुळे राज्यात कोरोना वाढल्याचा बाऊ करीत पुन्हा लॉकडाउन करण्याचा प्रयत्न सुरु आहे. 8 मार्च ही अधिवेशन मुदत असल्याने तोपर्यंत राज्यात कोरोना वाढतच राहणार आहे. यांचे मंत्रीसुद्धा अचानक कोरोनाग्रस्त होऊ लागले आहेत. केवळ पाच दिवस अधिवेशन घेण्यासाठी सरकारची ही पळवाट आहे.'' 

पडवे (ता. कुडाळ) येथील एसएसपीएम मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेला आमदार नितेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, चिटणीस मिलिंद कुलकर्णी, दीपलक्ष्मी पडते, विनायक राणे उपस्थित होते. राणे म्हणाले, ""कोरोना उपाययोजना करणे आवश्‍यक होते. राज्याने त्या केल्या नसल्याने पुन्हा कोरोना रुग्ण वाढत आहेत. राज्याची आरोग्य यंत्रणा कमकुवत आहे. डॉक्‍टर नाहीत. औषधे व साधनसामग्री नाही. परिणामी कोरोना मृत्यूदरात महाराष्ट्र देशात एक नंबरवर राहिला आहे. विकास ठप्प झाला आहे. जिल्हा नियोजनचा निधी डिसेंबरमध्ये दिला आहे. अद्याप कामांची वर्कऑर्डर नाही. हे सरकार उपाययोजना करण्यात कमी पडले आहे.

प्रशासनावर सरकारचा अंकुश नाही. त्यामुळे सरकार पूर्णपणे निष्क्रिय आहे.'' 
मुख्यमंत्री बसलेल्या उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीत वीजबिले माफ करण्याचे आश्‍वासन दिले होते; मात्र तेच आता वीज कनेक्‍शन तोडत आहेत. वास्तविक त्यांनी आपली घोषणा पूर्ण करणे आवश्‍यक होते. त्यामुळे भाजप महावितरणविरोधात आंदोलन करणार, अशी भूमिका यावेळी खासदार राणे यांनी मांडली. 

जिल्हा नियोजनचा जिल्ह्याचा खर्च 42 टक्के आहे. पालकमंत्र्यांचे कोणी ऐकत नाही. पालकमंत्र्यांनी वीज कनेक्‍शन न तोडण्याचे आदेश दिलेले असताना दुसऱ्या दिवशी वीज कनेक्‍शन तोडली गेली. जिल्ह्यातील क्राईम वाढला आहे. भ्रष्टाचार वाढला आहे. सरकारच्या निष्क्रियतेमुळे जिल्ह्यातील युवक आत्महत्या वाढल्या आहेत, अशी टीका मंत्री उदय सामंत यांच्यावर केली. चिपी विमानतळ येथे रस्ते, पाणी व वीज या तिन्ही सुविधा उपलब्ध झाल्यावर मी स्वतः केंद्रीय विमानमंत्री यांना परवानगी द्यायला सांगू, असेही सांगितले. 

मुख्यमंत्र्यांना वेळ पुरत नाही! 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील अनेक नेत्यांचे प्रताप बाहेर यायला लागले आहेत. अशा मंत्र्यांना सांभाळायला मुख्यमंत्र्यांना वेळ पुरत नाही, अशी टीका राणे यांनी केली. एकीकडे मुख्यमंत्री गर्दी करू नका, असे सांगतात तर दुसरीकडे त्यांचेच वनमंत्री संजय राठोड शक्तिप्रदर्शन करीत आहेत. यावरून मुख्यमंत्री ठाकरे यांचे कोणी ऐकत नाही, हे स्पष्ट होते, असे नारायण राणे म्हणाले. 

हे संत मंत्री आहेत का? 
पूजा चव्हाण प्रकरणात वनमंत्री राठोड यांचा संबंध जोडणाऱ्या अनेक क्‍लिप बाहेर आल्यात. जर राठोड यांचा यात संबंध नव्हता तर तर थेट पंधरा दिवसांनी मंदिरात प्रगट कसे झाले, हे काय संत मंत्री आहेत का, असा प्रश्‍न उपस्थित केला. शरद पवार यांनी राठोड यांच्यामुळे सरकार बदनाम होत असल्याचे म्हटले आहे. त्याचा दाखला देत राणे यांनी ज्यांच्या कृपेमुळे मुख्यमंत्री बनलात त्यांचे तरी ऐका, असा उपरोधिक टोला लगावला. राज्यातील अनेक सरपंच यांच्यापेक्षा हुशार व अभ्यासू असल्याची टीका त्यांनी केली. 

संपादन - राहुल पाटील
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com