लाच घेणारा हवालदार जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 नोव्हेंबर 2016

आरोंद्यात कारवाई ः दोषारोपपत्रासाठी मागितली लाच

सावंतवाडी : न्यायालयात लवकर दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी पाच हजारांची लाच स्वीकारताना आरोंदा पोलिस दूरक्षेत्राचे पोलिस हवालदार झापू पवार याला ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज दुपारी एकच्या सुमारास केली. या प्रकरणी पवार याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. त्याला रात्री अटक करून उद्या ओरोस येथे जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपविभागीय अधिकारी शंकर चिंदरकर यांनी सांगितले.

याबाबत अधिक माहिती अशी ः सावंतवाडी पोलिस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या आरोंदा दूरक्षेत्रावर झापू पवार हा हवालदार म्हणून कार्यरत आहे. दोन वर्षापूर्वी त्याची सावंतवाडी येथून त्या ठिकाणी बदली करण्यात आली होती. दोन महिन्यांपूर्वी आरोंदा येथे घडलेल्या एका प्रकरणात संशयित आरोपीविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यास पवार वेळकाढूपणा करीत होता. आपल्याला कामासाठी बाहेर जायचे असल्याने आरोपपत्र लवकर दाखल करा आणि आम्हाला मोकळे करा, असा तगादा संशयिताने त्याच्या मागे लावला होता. त्यावर पवार याने तुम्हाला आरोपपत्र लवकर दाखल करायला पाहिजे असल्यास पाच हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. त्यानंतर वारंवार पैशासाठी तो संशयिताला त्रास देऊ लागला. या त्रासाला कंटाळून त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे 18 नोव्हेंबरला तक्रार केली. त्यानुसार आज त्याला पकडण्यासाठी सापळा लावण्यात आला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपविभागीय अधिकारी श्री. चिंचाळकर यांनी सापळा रचला.

आरोंदा दूरक्षेत्रावर पैसे आणून दे, असे पवार याने तक्रारदाराला सांगितले. त्यानुसार तक्रारदार पैसे देण्यास गेला आणि पवार सापळ्यात अडकला. कारवाईबाबत चिंचाळकर म्हणाले, ""आम्ही नियोजनबद्ध सापळा रचून पवार याला अटक केली आहे. त्याने तक्रारदाराला पैसे आणून देण्यासाठी केलेले मोबाईल फोनचे डिटेल्स आम्ही ताब्यात घेतले होते. त्यांच्या चौकशीची प्रक्रिया सुरू आहे. त्याला उद्या (ता. 30) जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.''

लाचखोरी थांबेना
पोलिस खात्यात गेल्या काही दिवसांपासून लाचखोर पोलिसांवर कारवाई होत आहे. बांदा येथील तिघा कर्मचाऱ्यांना अटक आणि निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या घटना ताज्या असतानाच पवार हा लाच घेताना आढळून आल्याने पोलिस खात्यात खळबळ उडाली आहे.

Web Title: corrupt police caught