पर्यटन पुन्हा बाळसे धरतेय: हजारोंच्या संख्येने पर्यटक दाखल

konkan tourism story by bhushan torsekar
konkan tourism story by bhushan torsekar

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : कोरोनाचे सावट गेली 5 महिने पर्यटनावर दिसून आले. पर्यटनावर आधारित असलेल्या व्यवसायांना एप्रिल ते ऑगस्टमध्ये चांगलाच फटका बसला होता; मात्र दिवाळीनंतर जिल्ह्यातील पर्यटनाला वेग आला असून जिल्ह्यात दिवसा हजारोंच्या संख्येने पर्यटक दाखल होऊ लागले आहेत. समुद्रकिनारे, ऐतिहासिक वास्तु, धार्मिक स्थळे व तालुक्यातील मुख्य बाजारपेठांमध्ये पर्यटकांची वर्दळ पहावयास मिळत आहे. परिणामी पर्यटनावर आधारित असलेल्या व्यवसायांना आता सुगीचे दिवस येऊ लागले आहेत.


गेल्या 9 महिन्यांपासून कोरोनाच्या संकटामुळे संचारबंदी आणि सीमाबंदी लागू असल्याने नागरिकांना आपापल्या घरातच थांबावे लागले. कालांतराने संचारबंदीत शिथिलतेनंतर कोरोनाचा निरुत्साह घालविण्यासाठी राज्यातील व देशातील पर्यटकांची पावले टप्याटप्याने पर्यटन स्थळाकडे वळू लागली. सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा म्हणून जगात प्रसिद्ध आहे. या जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळे ही पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय बनून राहिला आहे. त्यामुळेच या जिल्ह्याला भेट देण्याची ओढ घेऊन अनेक पर्यटक दरवर्षी लाखोंच्या संख्येने हजेरी लावतात.

यात जिल्ह्याचे निसर्ग, समुद्र किनारे, खाडी, तलाव, खाद्यसंस्कृती, इथले लोकजीवन, राहणीमान, लोककला, धार्मिक उत्सव, रूढी व परंपरा हा सुद्धा पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय असल्याने हे सर्व जाणून घेण्यासाठी व अभ्यासासाठी कोकणातील रत्नागिरी सोबत सिंधुदुर्गाची निवड पर्यटक करतात. एकंदरीत ग्रामीण, भौतिक आणि पाकृतीक सिंधुदुर्ग हा जिव्हाळ्याचा विषय बनलेला असतो. कोरोनानंतर आपसूकच जिल्ह्याकडे पाऊले वळू लागल्याने पुन्हा पर्यटन व्यवसायलाही चांगले दिवस येऊ लागले आहेत.


महाराष्ट्राचे चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या आंबोलीसारख्या थंड हवेच्या ठिकाणी गोवा, कर्नाटक, गुजरात स्वराज्यातील सर्व जिल्ह्यातून पर्यटक दाखल होतात जून ते डिसेंबरएवढे 6 महिने वर्षा पर्यटन फुलून जाते. हिवाळा आणि उन्हाळा लाखो पर्यटक वेंगुर्ले, दोडामार्ग आणि मालवण या तालुक्यातील समुद्रकिनारे पाहण्यासाठी तसेच स्कुबा डायविंगसारखे जलक्रीडा आनंद घेण्यासाठी दाखल होतात. लॉकडाऊन शिथिलतेनंतर आता पुन्हा पर्यटकाने समुद्रकिनारे फुलू लागले आहेत. मालवण तालुक्यातील तारकर्ली, वायरी, देवबाग, देवगड तालुक्यातील कुणकेश्‍वर, विजयदुर्ग, तोंडवली, मिठमुंबरी, तारामुंबरी, आजरा तर वेंगुर्ले तालुक्यातील रेडी, शिरोडा, वेळागर, सागरेश्‍वर, मानसीश्‍वर, वेंगुर्ले बंदर, वायंगणी, कोंडुरा, खवणे निवती, कोचरा, भोगवे या जिल्ह्यातील सर्व समुद्रकिनार्‍यांवर गर्दी दिसू लागली आहे.

तारकर्ली, देवबाग, वेळागर, सागरेश्‍वर, वेंगुर्ले बंदर, कुणकेश्‍वर, देवगड, रेडी ही पर्यटन स्थळे सध्या गर्दीने फुलून जात आहेत. परिणामी पर्यटनावर आधारित असलेले हॉटेल व्यवसायिक, लॉजिंग, रेस्ट्रॉरंट, छोटे व्यापारी तालुक्यातील बाजारपेठांमधील व्यावसायिक यांच्या व्यापाराला चालना मिळाली असून कोरोना काळात रोडावलेला व्यापारी वर्ग आता आर्थिक फायदा आजमावत आहे.

कोरोना पार्श्‍वभूमीवर सीमाबंदी व संचारबंदी असल्याने पर्यटन स्थळे बंद ठेवण्यात आली होती. यात पूर्णतः शिथिल आल्यानंतर कालांतराने हळूहळू पर्यटकांची रीघ जिल्ह्यात सुरू झाली. कोल्हापूर, आजरा या दिशेने जिल्ह्यात कर्नाटक व घाटमाथ्यावरून येणारे पर्यटक आंबोलीतील काही पर्यटन स्थळांना भेटी देत आहेत. महादेवगड पॉईंट, कावळेशेत, हिरण्यकेशी या ठिकाणी काही प्रमाणात पर्यटक दाखल होत आहेत. आंबोलीत ट्रॅकिंगसाठी अल्प प्रमाणात का होईना आता प्रतिसाद मिळू लागला आहे. याशिवाय जिल्ह्यातील सिंधुदुर्ग, विजयदुर्ग यांसारखे अनेक गड-किल्ल्यांनाही साहसी पर्यटक भेटी देत आहेत.

जिल्ह्यात प्रसिद्ध असलेली धार्मिक पर्यटन स्थळे काही ठिकाणी खुली झाल्याने अनेक पर्यटक जिल्ह्या भ्रमंती करताना मंदिरानाही भेटी देत आहेत. त्यामुळे स्थानिक छोट्या व्यापारी वर्गाला त्याचा फायदा होत आहे. याशिवाय जिल्ह्यात दाखल झालेले पर्यटक  जिल्ह्यातील दशावतारकलेचा आनंदासह जत्रोत्सव, रूढी व परंपरा पाहण्यासाठी कोरोना नियमाचे पालन करून भेटी देत आहेत. जिल्ह्यातील खाद्यसंस्कृतीमध्ये झणझणीत बांगडा, सुरमई, पापलेट, कोळंबी, खेकडा या अस्सल मालवणी जेवणाचा आस्वाद उत्सुकतेने घेत आहेत. या दीड महिन्यात टप्प्याटप्प्याने पर्यटनाला चांगलीच उभारी आली असून जिल्ह्यात पर्यटनामुळे लाखोंची उलाढाल आता सुरू झाली आहे.

कोरोनावरही काही आठवड्यात लस येणार असल्याचे शासनाने जाहीर केल्याने पर्यटनासाठी लाखो पर्यटकांनी आनंदित होऊन सिंधुदुर्गाकडे आपला मोर्चा वळविला आहे. गोव्याचे पर्यटन करण्यासाठी पर्यटक गोव्याच्या दिशेने येत आहेत. त्यातील बहुतांशी पर्यटक हे सिंधुदुर्गातील पर्यटनस्थळांना भेटी देण्यासाठी अधिक उत्सुक असल्याचे पाहावयास मिळत आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाने पर्यटनावर परिणाम होईल, असे घाई गडबडीत निर्णय घेऊ नये, असे सर्वसामान्य नागरिकांतून व व्यापार्‍यांतून बोलले जात आहे.


संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com