रत्नागिरीत दुकानदार confus; आदेश नसल्याचा प्रशासनचा खुलासा

परस्पर निर्णय घेण्याऐवजी प्रशासनाकडून खात्री करावी
रत्नागिरीत दुकानदार confus; आदेश नसल्याचा प्रशासनचा खुलासा

रत्नागिरी : किराणा दुकाने सकाळी 7 ते 11 या दरम्यान उघडी राहतील, या वृत्ताने शहरात अनेक ठिकाणी किराणा खरेदीसाठी सकाळी नागरिकांनी दुकानांवर गर्दी केली; मात्र याबाबत प्रशासनाकडे खुलासा विचारता असा कोणतेही आदेश आला नसल्याचे सांगितले. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. किराणा दुकाने बंद राहतील फक्त घरपोच सेवा द्यावी. कोणत्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नये. परस्पर निर्णय घेण्याऐवजी प्रशासनाकडून खात्री करावी, असे मेसेज प्रशासनाने सोशल मीडियावर टाकले आहेत.

जिल्ह्यात संचारबंदीची कडक अंमलबजावणी सुरू आहे. अत्यावश्यक सेवांवरही बंधने आणली आहेत. त्यामुळे किराणा दुकानदार, भाजी, फळेवाले यांना सर्व चाचण्या करून घरपोच सेवा देण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. कालपर्यंत याची अंमलबजावणी सुरू होती; मात्र सोशल मीडियावर याबाबत अनेक पोस्ट फिरू लागल्या. शासनस्तरावर त्याबाबत काल निर्णय झाल्याचे मदत व पुनर्विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. 30 एप्रिलपर्यंत राज्यात कडक लॉकडाउनचा विचार आहे. त्याचे पहिले पाऊल म्हणजे जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत असलेल्या किराणा दुकाने आता केवळ सकाळी 7 ते 11 या दरम्यान उघडी ठेवण्याची परवानगी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

याचे पडसाद तत्काळ शहरात उमटले. शहरातील अनेक किराणा दुकानदारांनी सकाळी लवकर एक शटर उघडून किराणा देण्यास सुरवात केली. ग्राहकांना कोरोनाचे नियम लागू केले. एक-एक करत यादी घेऊन त्यांना जिन्नस देण्यात येत होते. अनेक ठिकाणी अशाप्रकारे आज किराणा दुकाने उघडण्यात आली होती.

अफवांवर विश्‍वास ठेवू नका

याबाबत प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट करीत या निर्णयाबात मोठा खुलासा केला. किराणा दुकाने बंदच राहतील फक्त घरपोच सेवा देण्याची परवानगी आहे. सकाळी 7 ते 11 या दरम्यान किराणा दुकाने चालू ठेवण्याबाबत कोणताही निर्णय प्रशासनाला प्राप्त झालेला नाही. त्यामुळे अफवांवर विश्‍वास ठेवू नका. कोणताही निर्णय परस्पर घेण्याऐवजी प्रशासनाकडून खात्री करून घ्यावी, असे आवाहन तहसीलदार शशिकांत जाधव यांनी सोशल मीडियावर केले आहे. त्यामुळे या निर्णयाबाबत काहीसा संभ्रम निर्माण झाला आहे.

Edited By- Archana Banage

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com