क्रिकेटपटू "विरेंद्र'ची चटका लावणारी एक्‍झिट 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

आरोस वरचीआळी येथील नाईक कुटुंबीय गेल्या काही वर्षापासून हैदराबाद येथे वास्तव्यास आहे. बालपण येथे गेल्यावर विरेंद्रचे शिक्षण हैदराबाद येथे झाले; मात्र गावाकडची ओढ त्याला कायम राहिली. सण, उत्सवानिमित्त गावाकडे दरवर्षी येणे असायचे. त्याचे वडील माजी सैनिक होते.

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग) - हैदराबादमधील सिकंदराबाद येथील मैदानावर अर्धशतक ठोकल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतलेल्या मूळ आरोस येथील क्रिकेटपटूचा मृत्यू झाला. विरेंद्र विठ्ठल नाईक (वय 38, रा. आरोस वरचीआळी सध्या रा. हैदराबाद) असे त्याचे नाव आहे. ही घटना काल (ता. 17) दुपारच्या सुमारास घडली. त्यांचे पार्थिव उद्या (ता. 19) आणण्यात येणार आहे. त्याची एक्‍झिट सर्वांना चटका लावणारी ठरली. 

आरोस वरचीआळी येथील नाईक कुटुंबीय गेल्या काही वर्षापासून हैदराबाद येथे वास्तव्यास आहे. बालपण येथे गेल्यावर विरेंद्रचे शिक्षण हैदराबाद येथे झाले; मात्र गावाकडची ओढ त्याला कायम राहिली. सण, उत्सवानिमित्त गावाकडे दरवर्षी येणे असायचे. त्याचे वडील माजी सैनिक होते. आई, पत्नी, दोन मुले, तीन भाऊ आणि तीन काका असे त्याचे कुटुंब आहे. विरेंद्र हा चौथा मुलगा होता. सिकंदराबाद (हैदराबाद) येथील एम. पी स्पोर्टिंग क्‍लबकडून मारडपल्ली स्पोर्टिंग क्‍लब) विरेंद्र हा क्रिकेट खेळायचा. काल (ता. 17) सकाळी एमपीबुल्स या संघाविरुद्ध क्रिकेट खेळताना त्याने तडाखेदार फलंदाजी करत 55 धावा काढल्या; मात्र एक चेंडू टोलावण्याचा नादात तो कॅच आऊट झाला. त्याच्या मते तो बाद नव्हता; मात्र अंपायरच्या निर्णयावर नाखूश होत तो तंबूत (पॅव्हेलियनमध्ये) परतला.

हृदयविकाराच्या झटक्‍याने मृत्यू 

तो चालत असताना अस्वस्थ वाटत होता. तंबूत परतल्यावर त्याने स्वतःसाठी इडलीची ऑर्डर दिली. तेव्हाच फ्रेश होण्यासाठी तो स्वच्छतागृहाकडे गेला असतानाच तोल जाऊन दरवाजाजवळ खाली पडला. या घटनेची जाणीव होताच तेथे असलेले स्पोर्टिंग क्‍लबच्या सदस्य व इतरांनी त्याला तातडीने सिकंदराबादमधील यशोदा हॉस्पिटलमध्ये नेले; मात्र त्याला तेथील डॉक्‍टरांनी मृत घोषित केले. त्याचा मृत्यू अपघातामुळे झाला की हृदयविकाराने याबाबत प्रश्‍नचिन्ह होते. यासाठी आज त्याचे शवविच्छेदन करण्यात आले असता हृदयविकाराच्या झटक्‍याने मृत्यू झाला असल्याचे निष्पन्न झाले. 

मुळचा आरोस गावचा

मूळ आरोस गावच्या विरेंद्रचा बालपणानंतरचा सर्व बराच काळ हैदराबाद सारख्या मोठ्या शहरामध्येच गेला. त्याची येथील परिसरात क्रिकेटपटू व उत्कृष्ट फलंदाज म्हणून मोठी ओळख होती. काल एमपीबुल्स या टिम विरुद्ध एकदिवसीय लीग सामन्यात तो जिद्दीने खेळताना दिसून होता. याआधी आपल्या फलंदाजीच्या जोरावर त्याने अनेक सामने जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. त्याने हैदराबाद क्रिकेटमधील अनेक चषकही आपल्या नावे केले होते. त्याचा 9 वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्याला 8 वर्षाचा मुलगा आणि 3 वर्षाची मुलगी आहे. आरोस येथे त्याचे मोठे कुटुंब असून अनिल नाईक, सुनील नाईक आणि संजय नाईक हे तीन काका आरोस येथे रहातात. तर दोन भाऊ पुणे येथे वास्तव्यास असून घटनेची माहिती मिळतात त्यांनी हैदराबाद येथे धाव घेतली. विच्छेदनासाठी मृतदेह हैदराबादमधील गांधी हॉस्पिटलला नेण्यात आला. विच्छेदनादरम्यान पोलिस तपासात त्याचा भाऊ अविनाशने हैदराबाद पोलिसांची भेट घेत माहिती दिली. 

आरोस येथे आज होणार अंत्यसंस्कार 
विरेंद्रचे बालपण हैदराबाद येथे गेले असले तरी गावाविषयी त्याला जिव्हाळा होता. तो सणासुदीला गावच्या घरी आवर्जुन यायचा. गेल्या चतुर्थीला तो आरोसमध्ये आला होता. त्याच्यावर आरोस येथेच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्याचे पार्थिव उद्या (ता. 19) दुपारी आरोस येथील मूळ गावी आणले जाईल. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cricketer Virendra Naik No More