esakal | होम क्‍वारंटाईन असूनही गोव्याला जाणे पडले महागात
sakal

बोलून बातमी शोधा

Crime against the family who went to Goa

सर्व कुटुंबे गोव्यातील डिचोली बाराजणनगर, मुरगाव वास्को, दाबोली वास्को, पर्वरी आदी ठिकाणाहून मणेरी-तेलीवाडी येथे आली होती.

होम क्‍वारंटाईन असूनही गोव्याला जाणे पडले महागात

sakal_logo
By
प्रभाकर धुरी

दोडामार्ग (सिंधुदुर्ग) - होम क्‍वारंटाईनमधून गायब झालेल्या मणेरीतील तीन कुटुंबातील नऊपैकी सात सदस्यांवर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. भारतीय दंड संहिताच्या कलम आणि महाराष्ट्र कोरोना कलम अंतर्गत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिस ठाण्यातून देण्यात आली. 

उपसरपंच सुधीर नाईक आणि ग्रामस्थ भगवान गवस यांच्या विनंतीवरून दोघा अल्पवयीन मुलांना कारवाईतून वगळण्यात आले. ती सर्व कुटुंबे गोव्यातील डिचोली बाराजणनगर, मुरगाव वास्को, दाबोली वास्को, पर्वरी आदी ठिकाणाहून मणेरी-तेलीवाडी येथे आली होती. त्यातील चौघांना 3 ऑगस्टपासून तर अन्य पाच जणांना 5 ऑगस्टपासून 14 दिवसांसाठी होम क्‍वारंटाईन केले होते.

त्यांची भेट घेण्यासाठी सोमवारी सकाळी आरोग्य अधिकारी प्रदीप ठोंबरे, आरोग्य सेविका रुपाली पिंगुळकर आणि आशा स्वयंसेविका गेले असता त्यांना होम क्‍वारंटाईन केलेल्या ठिकाणी नसल्याचे आढळले. त्यांनी घरात माहिती घेतली असता ते सर्वजण काही दिवसांपुर्वी पुन्हा गोव्याला गेल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांनी त्याबाबतची माहिती कोविड-19 ग्रामनियंत्रण समितीला आणि आपल्या वरिष्ठांना दिली होती. 

त्यानंतर ग्रामनियंत्रण समितीचे सदस्य आणि ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुधीर नाईक आणि ग्रामस्थ भगवान गवस यांनी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली होती. त्या अनुषंगाने प्रभारी तहसीलदार संजय कर्पे यांनी पोलिसांकडे कारवाईची शिफारस केली होती. त्यामुळे पोलिस निरीक्षक सुनील थोपटे यांच्या मार्गदर्शनावरून त्या सातही जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. 

संपादन - राहुल पाटील

loading image
go to top