बोगस डॉक्‍टरवर कोंडमळ्यात कारवाई

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मार्च 2017

सावर्डे - जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाच्यावतीने अचानक टाकलेल्या धाडीत चिपळूण तालुक्‍यातील कोंडमळा येथे एका बोगस डॉक्‍टरवर कारवाई करण्यात आली. परितोष प्रमोथ बिश्‍वास (वय 45, मूळ गाव पूर्बा, अशोकपल्ली, ता. रायगंज, जि. दिनाजपूर, पश्‍चिम बंगाल) असे या बोगस डॉक्‍टरचे नाव आहे.

सावर्डे - जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाच्यावतीने अचानक टाकलेल्या धाडीत चिपळूण तालुक्‍यातील कोंडमळा येथे एका बोगस डॉक्‍टरवर कारवाई करण्यात आली. परितोष प्रमोथ बिश्‍वास (वय 45, मूळ गाव पूर्बा, अशोकपल्ली, ता. रायगंज, जि. दिनाजपूर, पश्‍चिम बंगाल) असे या बोगस डॉक्‍टरचे नाव आहे.

जिल्हा परिषद आरोग्य विभाग व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरी यांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्या आधारे संयुक्त कारवाई पथकाने कोंडमळा येथे जाऊन प्रथम पाहणी केली. सत्यता पडताळून पाहिल्यानंतर बोगस डॉक्‍टर परितोष बिश्‍वास याच्याकडे वैद्यकीय क्षेत्रातील पदवी प्रमाणपत्राची मागणी केली. त्या वेळी त्याने इंडियन कौन्सिल ऑफ पॅरामेडिकल सोसायटी (पश्‍चिम बंगाल)चे प्रमाणपत्र दाखवले. त्याची पदवी बोगस असल्याचे निदर्शनास येताच पोलिस उपनिरीक्षक रविराज फडणीस यांच्यापुढे त्याने आपण बोगस डॉक्‍टर असल्याचे कबूल केले. या वेळी पोलिस हेडकॉन्स्टेबल व्ही. जी. नागले, विजय मोरे, मिलिंद कदम, अमोल भोसले, संदीप मालप, विजय आंबोकर, तसेच जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे आरोग्य पर्यवेक्षक आर. एम. शिंदे यांनी बोगस डॉक्‍टरचा पर्दाफाश केला. या वेळी सावर्डे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अजित पाटील उपस्थित होते.

गेली पाच वर्षे कोंडमळा बस स्थानकासमोर बंगाली बोगस डॉक्‍टर वैद्यकीय सेवा देत होता. महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिकलचे पंजीकरण नसताना ऍलोपॅथी व आयुर्वेदिक औषधे वापरून वैद्यकीय व्यवसाय खुलेआम करत होता. धाडीत त्याच्याकडे ऍलोपॅथी औषधसाठा, वैद्यकीय क्षेत्रासाठी आवश्‍यक असे साहित्य आढळून आले, ते जप्त करण्यात आले. महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियमानुसार व लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी सावर्डे पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. घटनास्थळी पंचनामा करून बोगस डॉक्‍टरला ताब्यात घेतले.

जिल्ह्यामध्ये बोगस डॉक्‍टरांवर कारवाई केली जात आहे. आतापर्यंत कारवाईत 32 बोगस डॉक्‍टर सापडले आहेत. बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांना लगाम घालण्यासाठी योग्य पावले उचलण्यात येतील.
- रविराज फडणीस, पोलिस उपनिरीक्षक

 

Web Title: crime on bogus doctor