दोघे एकत्र राहत होते, जेवणही एकत्र करत होते, मात्र दुसऱ्यादिवशी सकाळी घडलेल्या घटनेने पोलिसांनाही बसला धक्का

सकाळ वृत्तसेवा
Friday, 22 January 2021

खून प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील करत आहेत.

दाभोळ (रत्नागिरी) : दापोली तालुक्‍यातील शिरशिंगे येथे सेंट्रिंगच्या कामासाठी आलेल्या कामगाराचा खून केल्याप्रकरणी एका संशयितास दापोली पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले. त्याला पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

शिरशींगे येथील एसआरसिटी येथे ७ जानेवारी पासून राजेश बोडरे याचेसोबत लुईस हा सेंट्रींगच्या कामासाठी आला होता. राजेश व लुईस एकाच ठिकाणी राहत होते, दोघे जेवणही एकत्र करत असत. मंगळवारी दुपारी या दोघांनी एकत्र मद्यप्राशन केले व नंतर लुईस बाहेर फिरायला गेला होता, मात्र, लुईस वेळेत परत न आल्याने राजेश जेवण करून झोपला होता, सकाळी त्याला शेजारच्या खोलीत रक्ताच्या थारोळ्यात लुईस आढळून आला, असे त्याने सांगितले होते.

हेही वाचा - महाराष्ट्रावर सातत्याने केंद्र सरकार अन्याय करत आहे 

दापोली पोलिसांना याची माहिती देण्यात आल्यावर दापोली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व राजेशकडे चौकशी केली असता, त्याने दिलेल्या उत्तरात विसंगती आढळल्याने दापोली पोलिसांनी राजेशची पुन्हा चौकशी केली. यावेळी त्याने लुईसला मारल्याची कबुली दिली असून त्यासाठी वापरलेला हातोडाही दापोली पोलिसांनी जप्त केला आहे.या प्रकाराने संपूर्ण दापोलीत खळबळ उडाली होती. खून प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील करत आहेत.

मृत मूळ ओरिसा राज्यातील रहिवासी

लुईस हा मूळ ओरिसा राज्यातील रहिवासी होता. तो सेंट्रिंगच्या कामाकरिता रोहा येथे भाड्याची खोली घेऊन राहत होता. तेथे त्याची राजेश बोडरे (वय ५०) यांच्याबरोबर ओळख झाली. या ओळखीतून राजेश बोडरे त्याला शिरशींगे येथे घेऊन आला होता.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crime case in ratnagiri dead one person attack to other person in ratnagiri