तत्कालीन वनक्षेत्रपालांसह चौघांवर गुन्हे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जानेवारी 2017

मालवण - आडवली येथील बोगस मालकी प्रकरणाच्या आधारे सॉ मिल सील केल्याप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात तत्कालीन वनक्षेत्रपाल विजय भोसले यांच्यासह चौघांविरोधात येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतची तक्रार सॉ मिलचे मालक जयंत बरेगार यांनी दिली.

मालवण - आडवली येथील बोगस मालकी प्रकरणाच्या आधारे सॉ मिल सील केल्याप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात तत्कालीन वनक्षेत्रपाल विजय भोसले यांच्यासह चौघांविरोधात येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतची तक्रार सॉ मिलचे मालक जयंत बरेगार यांनी दिली.

बरेगार यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीचा आशय असा ः २००८ मध्ये सावंतवाडी वन विभागात सॉ मिलचे परवाने नूतनीकरण एका वर्षाऐवजी १० वर्षे मुदतीचा परवाना घेता येईल, असा पर्याय दिला होता. या पर्यायानुसार जिल्ह्यातील सुमारे ८० सॉ मिल परवानाधारकांनी १० वर्षे मुदतीकरिता (२००८ ते २०१७) परवाना नूतनीकरण करून घेतले होते. यामध्ये जयंत रा. बरेगार यांनीसुद्धा त्यांच्या मालकीच्या आडवली येथील चंद्रलांबा सॉ मिलच्या परवान्याचे नूतनीकरण १० वर्षाच्या मुदतीकरिता करून घेतले होते. दहा वर्षाचा परवाना देण्यामागचा हेतू परवाना देताना सांगण्यात आला. १० वर्षे नूतनीकरण करून दिल्याबद्दल त्या परवानाधारकाने उपवनसंरक्षक यांच्यासाठी १० हजार, सहायक वनसंरक्षक यांच्याकरिता ५ हजार दरवर्षी द्यावे, अशी मागणी या वेळी केली. वनक्षेत्रपाल कुडाळ यांच्यासाठी व वनपाल मालवण यांच्यासाठी निराळा हप्ता मागितला होता.

श्री. बरेगार यांच्याकडे याबाबत मागणी करण्यात आली. त्यांनी मागणी धुडकावून लावली होती. श्री. बरेगार यांचे हप्ताविरोधी आंदोलन यशस्वी झाल्यास १० वर्षे मुदतीसाठी नूतनीकरण करून घेतलेल्या ८० सॉ मिलधारकांकडून मिळणाऱ्या हप्त्यांवर गंडांतर येणार म्हणून हप्ता देण्यास नकार दिल्यास काय परिणाम होतील, याचे उदाहरण देण्याकरिता वनअधिकारी, कर्मचारी यांनी काही नागरिकांना हाताशी धरून कट केला, असे बरेगार यांचे म्हणणे आहे. 

त्यांच्या म्हणण्यानुसार, खात्यातील कर्मचारी, अधिकारी व स्थानिक नागरिक यांना सॉ मिलकरिता कुंभारमाठ (ता. मालवण) येथील एक प्रकरण झाडतोडीकरिता दाखल झाले. नंतर झाड मालकांनी झाडतोडीचा विचार रद्द केल्याने मंजुरीकरिता पाठपुरावाच केला नाही व खात्याला तसे कळविलेले नाही. त्या प्रकरणातील कागदपत्राचा वापर करून इतरत्र तोड केलेल्या साग व आंबा मालाचे बनावट प्रकरण संगनमत करून तत्कालीन वनक्षेत्रपाल विजय अप्पासाहेब भोसले, तत्कालीन मालवण वनपाल प्र. ल. कांबळी, तत्कालीन वनरक्षक विजय द. हिंदळेकर व स्थानिक पंच तयार करून त्यांच्या साहाय्याने व मालकी क्षेत्रातील खातेदार यांच्या बनावट सह्या करून आपल्या पदाच्या, शिक्का व सह्या यांचा तसेच लाकडावर उमटावयाच्या शिक्‍क्‍याचा गैरवापर करून बनावट प्रकरण तयार केले. त्या प्रकरणातील लाकूड श्री. बरेगार यांच्या सॉ मिलमध्ये चिरण्याकरिता टाकण्यास सांगण्यात आले. आपला चिरकामाचा व्यवसाय व परवाना असलेल्या मालावर शिक्के असल्याची खात्री करून व सोबत वैध परवाना असल्याची खात्री करून लाकूड चिरकामाकरिता उतरवून घेण्यात आले. श्री. भोसले यांच्या आदेशाना त्याचे अधिनस्त कर्मचारी यांनी हे लाकूड ८ ऑगस्ट २००८ ला श्री. बरेगार व त्यांच्या कर्मचारी यांचे अनुपस्थितीत जप्त केले व बचावाची कोणतीही संधी न देता सॉ मिल सील करण्यात आली होती. ती ७४ दिवस सील करून ठेवली होती. श्री. बरेगार यांनी कोल्हापूर येथील वरिष्ठ अधिकारी, वनसंरक्षक कोल्हापूर याच्याकडे तक्रार दाखल केली. त्यावर त्यांनी उपवनसंरक्षक सावंतवाडी यांना सॉ मिलधारक श्री. बरेगार यांची काहीही चूक आढळत नसल्यामुळे प्रकरणाचा पुनर्विचार करून निर्णय घ्यावा अन्यथा पुढील बाबींना ते जबाबदार राहतील, असा निर्णय दिला.

उपवनसंरक्षक यांनी ५०० रुपये दंड आकारत सॉ मिल खोलण्याचे आदेश दिले. श्री. बरेगार यांनी दंड १ नोव्हेंबर २००८ ला अंडर प्रोटेस्ट भरून सॉ मिल सील खोलून घेतले. तपासाअंती जप्त केलेले सर्व लाकूड पासातील असल्याचे सिद्ध झाल्याने सर्व लाकूड ताब्यात देऊन दंडात्मक भरलेली रक्कम ५०० रुपये परत देण्यात आली.

वैभववाडी, कणकवलीचा दाखला
पत्रकात पुढे म्हटले आहे, की वैभववाडी येथील बोगस वृक्षतोड प्रकरणी वनक्षेत्रपाल कणकवली यांच्यावर बोगस वृक्षतोडीसंबंधी फौजदारी गुन्हा दाखल झाल्याचे समजल्याने त्याबद्दल तक्रारदार दीपक शिरोडकर यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली. श्री. बरेगार यांनी याबाबत मालवण पोलिस स्टेशन येथे संपर्क साधून लेखी तक्रार दाखल केली. प्रकरणातील सर्व माहिती अधिकारात प्राप्त कागदपत्राचा विचार करून मालवण पोलिस निरीक्षक यांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचे यात नमूद आहे. यात ॲड. संदीप निंबाळकर व ॲड. रवी कंग्राळकर यांनी मार्गदर्शन केले.

Web Title: crime on forest security