esakal | चोरी कर्नाटकात, सराईतांना अटक कोकणात

बोलून बातमी शोधा

criminals arrested in konkan

सूऱ्याचा धाक दाखवून कर्नाटक राज्यातील यल्लापुर येथे जबरी चोरी करून पसार झालेल्या मध्यप्रदेश धार येथील टोळीस सिंधुदुर्ग जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ओरोस जिजामाता चौक येथून ताब्यात घेतले आहे. या टोळीकडून 2 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या संशयित दोघांना यल्लापुर (कर्नाटक) पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

चोरी कर्नाटकात, सराईतांना अटक कोकणात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ओरोस (सिंधुदुर्ग) - सूऱ्याचा धाक दाखवून कर्नाटक राज्यातील यल्लापुर येथे जबरी चोरी करून पसार झालेल्या मध्यप्रदेश धार येथील टोळीस सिंधुदुर्ग जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ओरोस जिजामाता चौक येथून ताब्यात घेतले आहे. या टोळीकडून 2 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या संशयित दोघांना यल्लापुर (कर्नाटक) पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

मध्यप्रदेश धार येथील सराईत गुन्हेगारांनी 4 मार्चला रात्री यल्लापुर (कर्नाटक) येथील एका व्यक्तीला चाकू सुऱ्याचा धाक दाखवून रोख रक्कम 1 लाख रूपये व सोन्याच्या दागिन्यांची लूटमार केली होती. त्यानंतर दुचाकी घेवून ते पसार झाले होते. या प्रकरणी यल्लापुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुह्याची कल्पना येथील पोलिस दलाला दिली होती. संशयितांच्या शोधासाठी दोन पथके तैनात केली होती. याच अनुषंगाने ओरोस जिजामाता चौक येथे महामार्गावर अचानक नाकाबंदी करून तपासणी केली असता पावणे पाचच्या सुमारास निळ्या काळ्या रंगाची नंबर प्लेट नसलेली दुचाकीवरून दोन व्यक्ती प्रवास करताना एलसीबीच्या पथकाला दिसल्या. त्यांना थांबण्याचा इशारा पोलिसांनी केला असता त्यांनी दुचाकी तेथेच टाकून पळण्याचा प्रयत्न केला; मात्र हा प्रयत्न पोलिसांनी हानुन पाडत त्यांना तेथेच ताब्यात घेतले.

त्यांची कसून तपासणी केली असता त्यांच्याकडे दोन सोन्याची मंगळसूत्रे, दोन सोन्याच्या अंगठ्या, तीन सोन्याच्या बांगड्या, एक चांदीचा पेला, एक चांदीचे नाणे, रोख रक्कम 25 हजार आणि दुचाकी, असा एकूण 2 लाख 45 हजारांचा मुद्देमाल आढळला. दोन्ही संशयितांना पुढील तपासासाठी यल्लापुर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक सुनील धनावडे यांनी ही माहिती दिली.