मणेरी नदीकिनारी वाढला मगरींचा संचार

सकाळ वृत्तसेवा | Tuesday, 2 July 2019

दोडामार्ग - मणेरीत भर दिवसा मगरींचे दर्शन घडू लागले आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. तिलारी नदी काठावर मगरींचे दिसणे आता रोजचेच झाले आहे. तिलारी नदी मणेरीतून गोव्याकडे जाते.

दोडामार्ग - मणेरीत भर दिवसा मगरींचे दर्शन घडू लागले आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. तिलारी नदी काठावर मगरींचे दिसणे आता रोजचेच झाले आहे. तिलारी नदी मणेरीतून गोव्याकडे जाते.

नदीवर महिला कपडे धुण्यासाठी, पुरुष मंडळी आंघोळीसाठी आणि गुरांना पाणी देण्यासाठी नेत असतात; पण अलिकडे मणेरीत तिलारी नदी काठावर अनेक मगरी पहुडलेल्या ग्रामस्थांना दिसल्या. त्यामुळे आता नदीवर जाण्याची भीती त्यांना वाटते आहे. पावसाळ्यात पाण्याची पातळी वाढली की मगरी शेतात आणि वस्तीत येण्याची भीती आहे.

काही महिन्यांपुर्वी कुडासे मणेरी रस्त्यालगतच्या एका ओहोळात हात पाय धुण्यासाठी उतरलेल्या शेतकऱ्यावर हल्ला करुन त्याच्या हातचा चावा घेतला होता. त्याचे दैव बलवत्तर असल्याने प्राणावरचे हातावर निभावले होते. तसे प्रकार आताही घडू शकतात. त्यामुळे वनविभागाने मगरींचा बंदोबस्त करण्याची मागणी तेथील ग्रामस्थ भगवान गवस आणि अरुण सावंत यांनी केली आहे.

वास्तव्य धोकादायक 
तिलारी नदीत वावर असलेल्या मगरींची संख्या मोठी आहे. एक मगर एका वेळी अनेक पिल्लांना जन्म देते. त्यामुळे त्यांची संख्या वीस पंचवीस पटीने वाढते. ते नदीकाठावर राहणाऱ्या ग्रामस्थांसाठी धोकादायक आहे.