चिपळुणात मगरींचे दर्शन दुर्मिळ

एक तृतीयांश पाणथळे नष्ट; कायदा असूनही संरक्षणाचा जाणवतोय अभाव
 मगरी
मगरीsakal

चिपळूण: शहरातील पाणथळी भागात नेहमी मगरींचे दर्शन व्हायचे. पाणथळी भागातील चिखलात मगरी बसलेल्या असायच्या, आता पाणथळी भागच भराव टाकून नष्ट केल्या जात आहे. त्यामुळे चिखलात बसलेल्या मगरी पाहणेही दुर्मिळ होण्याचा धोका आहे. १९९० पासून पाणथळामधील सुमारे एक तृतीयांश पाणथळे नष्ट झाली आहेत. अनेक छोटी-मोठी पाणथळे अखेरच्या घटका मोजत आहेत. पर्यावरणाचा कायदा असूनही त्यांना संरक्षण प्राप्त न झाल्याने जागा समस्यांनी ग्रासलेल्या आहेत.

चिपळूण शहरातील पाणथळी भागात सर्रास मगरी आढळतात. दुपारच्यावेळी मगरी उन्हात बसण्यासाठी पाण्याबाहेर येतात. नंतर पुन्हा पाण्यात जातात. शहरांमधील पाणथळी भागात मगरी निवांत राहत होत्या. नागरिकांच्या दारात येणाऱ्या मगरींना प्राणीमित्र आणि वन विभागाचे कर्मचारी नैसर्गिक अधिवासात सोडत होते. या मगरींनी आतापर्यंत कधी नुकसान पोचविले नाही. शहरात आढळणाऱ्या मगरी एक प्रकारे वैभव मानले जात होते. मात्र, पाणथळींबरोबर मगरींचे अस्तित्वही शहरातून नष्ट होण्याचा धोका आहे.

पाणथळ जागांचा प्रमुख शत्रू मानवच आहे. लोकवस्तीचा व मानवी गरजांचा दबाव या जागांवर आहे. शहरात लोकवस्ती वाढत गेल्याने लॅंड माफियांकडून पाणथळींच्या जागा बळकाविल्या गेल्या. त्या विरोधात स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधी किंवा सामाजिक संघटनांनी पावले उचलली नाहीत. सध्या तर अनेक रेडझोन जागेत, नदीकाठी, खाडी किनारी इमारती उभ्या आहेत. त्यामुळे महापुरासारखे संकट वाढले आहे. बहादूरशेख नाका ते पाग पॉवरहाऊस, खेंड, बावशेवाडी ते मिरजोळीच्या डोंगरात पूर्वी नैसर्गिक झरे, विहीरी आणि पाण्याचे डोह आढळून यायचे. कालांतराने डोंगर कपाऱ्यातील दरड कोसळण्याचे प्रकार सुरू झाले. पावसाबरोबर ते वाहून पाण्याचे नैसर्गिक स्रोत बंद झाले. पाणथळ जागांवर कचरा, प्लास्टिक, रसायने टाकून या जागांवर असलेले जलचरचे अधिवास संपुष्टात आणले गेले.

पक्षी निरीक्षकांची शहराकडे पाठ

पाणथळीच्या काठावरील पूर्वी झाडे होती. त्यावर विविध प्रकारचे पक्षी आढळून यायचे. त्यातून पक्षी अधिवासाच्या नोंदी घेणे सोपे जात होते. त्या आधारे दुर्मिळ पक्षी आणि जागांचे संवर्धन, संरक्षण करण्यासाठी पक्षी निरिक्षक विविध प्रकारचे पर्याय सुचवित होते. मोठ्या शहरातील पक्षीनिरीक्षक पूर्वी पक्षीनिरीक्षणासाठी चिपळूणला येत. मात्र, आता वैयक्तिक किंवा सामुहिकरित्या अशा जागा स्वच्छ करण्यास कोणी लक्ष देत नाही. त्यामुळे पक्षीनिरीक्षकांनीही चिपळूणकडे पाठ फिरवली आहे.

पाणथळची व्याख्याच बदलली

रसायनमिश्रित पाणी नदीत, ओढ्यात तलावात जाते. त्याचा परिणाम जैवविविधतेवर होतो. त्यांच्यात जनुकीय बदलही होतात. प्रजातीही नष्ट होतात. याशिवाय शहराचे सांडपाणी, कचरा, प्लास्टिक प्रदूषण, कीटकनाशक यामुळे पाण्यावर होणारा परिणाम, अनियंत्रित वाढणारी जलपर्णी, वनस्पती वाढतात. न्यायालयाच्या निर्णयानुसार अडीच हेक्टरपेक्षा मोठ्या पाणथळ जागांनाच पाणथळच्या व्याख्येत बसविले गेल्याने महत्त्वपूर्ण परिसंस्था असलेले लहान तलाव, तळी या यादीतून गाळल्या गेल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com