हाऊसबोट उभारणीत मालवणात कोटीचा घोटाळा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

मालवण - कुंभारमाठ येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विकास व दर्जावाढीसाठी सरकारने २००९ मध्ये मंजूर केलेल्या प्रस्तावित आराखड्यात नमूद व मंजूर नसलेली हाऊसबोट बांधणे तसेच स्पीडबोट खरेदीचा प्रकार उघडकीस आला आहे.

मालवण - कुंभारमाठ येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विकास व दर्जावाढीसाठी सरकारने २००९ मध्ये मंजूर केलेल्या प्रस्तावित आराखड्यात नमूद व मंजूर नसलेली हाऊसबोट बांधणे तसेच स्पीडबोट खरेदीचा प्रकार उघडकीस आला आहे. यासाठी दस्तऐवज बनवून पदाचा दुरुपयोग करताना ९९ लाख २८ हजार रुपयांच्या निधीचा गैरवापर करून केंद्र आणि राज्य सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट कमिटीचे चेअरमन जगन्नाथ महादेव कद्रेकर (रा. राजमाता आरटीओ लेन, अंधेरी पश्‍चिम, मुंबई) याच्याविरोधात येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

याबाबतची फिर्याद शिक्षण व प्रादेशिक कार्यालय खेरवादी वांद्रेचे सहायक संचालक अजित पोपट शिंदे यांनी दिली. सरकारने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विकास व दर्जावाढसाठी अडीच कोटी रुपयांचा निधी संस्थेकडे जमा केला होता. प्रस्तावित विकास आराखड्यात अनेक कामांचा समावेश होता. मात्र, रिअल्टर ॲण्ड डेव्हलपर्स अंधेरी-मुंबई यांच्या आस्थापनेवर कार्यरत नसतानाही तेथे कार्यरत असल्याचे दाखवून कुंभारमाठ येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे चेअरमनपद धारण करून जगन्नाथ कद्रेकर याने २००९ च्या प्रस्तावित आराखड्यात नमूद व मंजूर नसलेली हाऊसबोट स्वबळावर बांधण्यासाठी आपल्या अधिकारात मंजुरी घेत त्याचे बांधकाम सुरू केले. यासाठी ८९ लाख २८ हजार रुपयांचा गैरवापर केला. शिवाय, नमूद व मंजूर नसलेली स्पीडबोट खरेदीसाठी दस्तऐवज तयार करून दहा लाख रुपयांची स्पीडबोट खरेदी केली. त्यांचे रजिस्ट्रेशन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नावे होणे आवश्‍यक असताना त्याने ते स्वतःच्या नावे करून सरकारची ९९ लाख २८ हजार रुपयांची फसवणूक केली. 

ही घटना २८ जानेवारी २००९ ते ३१ मे २०१२ या कालावधीत घडली. यात २०१२ च्या सुधारित विकास आराखड्यात वेल्डर, डिझेल मॅकेनिक, फिटर, फॅशन टेक्‍नॉलॉजी, ड्रायव्हर कम मॅकेनिक, इलेक्‍ट्रॉनिक मॅकेनिक, मॅकेनिक कम ऑपरेटर इलेक्‍ट्रॉनिक्‍स सिस्टम यांचा समावेश होता. परंतु, याच सुधारित आराखड्यात रिसोर्स जनरेशन या अंतर्गत हाऊसबोट बिल्डिंग प्रोजेक्‍ट याचा नव्याने समावेश केला.

यानंतर आयएमसी कमिटीच्या अनेक बैठका झाल्या. यात हाऊसबोट बांधण्यासाठी लाकडाची मागणी, खतावणीस मान्यता, इंजिन खरेदी, हाऊसबोट डेक बांधणी, तीन रूमऐवजी पाच रूम बांधण्याचा ठराव घेतला. १२ ऑक्‍टोबर २०११ ला झालेल्या बैठकीत हाऊसबोट बांधकाम पूर्ततेसाठी वरिष्ठ कार्यालयाची मंजुरी घेतल्याशिवाय उर्वरित काम न करण्याचा तसेच मंजुरी घेतल्याशिवाय कोणताही खर्च करायचा नाही, असे ठरवत बोट बांधण्यास स्थगिती दिली. मात्र, याच बैठकीत २५ लाख रुपये मागणीचा ठराव संमत करून त्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. 

सध्या ही हाऊसबोट वापरात नसून, ती देवबाग डिंगेवाडी येथील दीपक सामंत यांच्या जमिनीत ठेवली आहे; तर स्पीडबोट राजकोट मेढा समुद्रकिनारी एस. एम. कद्रेकर यांच्याकडे आहे, असे तक्रारीत म्हटले आहे. पोलिस निरीक्षक विनीत चौधरी अधिक तपास करीत आहेत.

मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन
भारताचे नियंत्रक व महालेखापाल परीक्षक यांनी ३१ डिसेंबर २०१६ च्या अहवालावर आक्षेप घेतल्याने व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाने चौकशी समिती नेमली. समितीने २१ जून २०१८ ला अहवाल दिला. यात डीजीईटी, नवी दिल्ली यांनी पीपीपी योजनेबाबत दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे संस्था व्यवस्थापन समितीने उल्लंघन करून रकमेचा गैरवापर केल्याचे स्पष्ट केले. त्यानुसार जगन्नाथ कद्रेकर याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 
 

Web Title: Crores scam in House Boat establishment in Malvan