पालीत बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी

अमित गवळे 
रविवार, 1 जुलै 2018

रेवस ते पाली अशी पायी पालखी घेऊन संकष्टीच्या आदल्या दिवशीच काही भाविक पालीत दाखल झाले होते. संकष्टी निमित्त मंदिर परिसरातील दुकाने व हाॅटेल ग्राहकांनी गजबजले होते.

पाली (जि. रायगड) - संकष्टी चतुर्थी निमित्त अष्टविनायका पैकी एक असलेल्या  बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी पालीत भाविकांनी गर्दी केली होती. रविवारची (ता. 1) सुट्टी असल्याने भाविकांनी पहाटे पासूनच दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. तसेच पावसाने उघडीप दिल्याने भाविकांची गैरसोय झाली नाही. परिणामी गर्दी अधिकच वाढली होती.

रेवस ते पाली अशी पायी पालखी घेऊन संकष्टीच्या आदल्या दिवशीच काही भाविक पालीत दाखल झाले होते. संकष्टी निमित्त मंदिर परिसरातील दुकाने व हाॅटेल ग्राहकांनी गजबजले होते. भाविकांच्या सोईसाठी बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीन चोख व्यवस्था करण्यात आली होती. परिसरातील हॅाटेल, खेळण्याची व शोभिवंत वस्तुंची दुकाने, नारळ, हार, फुल व पापड, मिरगुंड विक्रेते, प्रसाद व पेढेवाले अादिंचा धंदा तेजित होता. भरलेली दुकाने व गर्दि यामुळे मंदिर परिसरास यात्रेचे स्वरुप आले होते.अनेक भाविक स्वतःची वाहने घेवून आले. होते तर काही खाजगी व सार्वजनिक बसेसने दर्शनासाठी आले होते. यामुळे पालीतील रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती.परंतू नाक्यानाक्यावर तैनात असलेले पोलिस तसेच बल्लाळेश्वर मंदिर ट्रस्टचे सुरक्षा रक्षक वाहतुक सुरळीत करत होते. पाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. 

बल्लाळेश्वर ट्रस्टच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी शुद्ध थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. नाममात्र दरात प्रसादालयामध्ये प्रसाद (भोजन) उपलब्ध आहे. भाविकांना राहण्यासाठी दोन सुसज्ज भक्त निवास आहेत. रांगेत उभे राहण्यासाठी रेलींग व शेड उभारण्यात आली आहे. वाहने पार्क करण्यासाठी देवस्थानची दोन भव्य मोफत वाहन तळ देखील आहे. तसेच सुसज्ज स्वच्छता गृह देखिल उभारण्यात आले आहेत. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होत नाही. -
अॅड. धनंजय धारप, अध्यक्ष, बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट,पाली 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Crowd Of Devotees At ballaleshwar paali