गोव्यात हाऊसफुल्लची पाटी : थर्टीफस्टसाठी पर्यटक कोकणात, डिस्टन्सिंगचा फज्जा 

Crowds coastal tourist spots in Ratnagiri district
Crowds coastal tourist spots in Ratnagiri district

रत्नागिरी : ख्रिसमसच्या सुट्टीला जोडून आलेली शनिवार, रविवारची सुट्टी अनेकांच्या पथ्थ्यावर पडली असून रत्नागिरी जिल्ह्यातील किनारी पर्यटनस्थळांवर गर्दीच गर्दी दिसत आहे. रत्नागिरीतील गणपतीपुळे, गुहागर, दापोलीतील मुरुड, हर्णैसह विविध किनारी भाग पर्यटकांनी फुलून गेले आहेत. कोरोनाच्या सावटामुळे हाऊसफुल्लचे बोर्ड लागलेले नसले तरीही टाळेबंदीतील तूट भरुन काढण्यात व्यावसायिकांना हातभार लागला आहे. एकट्या गणपतीपुळेत कोटीच्या घरात उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. 

महानगरपालिका क्षेत्रांमध्ये रात्री संचारबंदी केल्यामुळे अनेकांनी छोट्या शहरांसह ग्रामीण भागाकडे मोर्चा वळवला आहे. 25 डिसेंबरपासून गणपतीपुळे, मालगुंड, आरे-वारेसह विविध पर्यटनस्थळांवर गर्दी आहे. कोरोनाच्या सावटामुळे दोन पर्यटन हंगाम गमावलेल्या व्यावसायिकांना दिवाळीनंतर ख्रिसमसने हात दिला. मंदिरे सुरू झाल्यानंतर पर्यटक फिरायला बाहेर पडले होते. गुलाबी थंडीमुळे पर्यटकांना आगळीवेगळी पर्वणीच मिळाली आहे. 


पहाटे पडणाऱ्या धुक्‍याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक किनाऱ्यावर फिरत आहेत. तीन दिवसात दिवसाला पाच ते साडेपाच हजाराहून अधिक पर्यटकांनी गणपतीपुळेत हजेरी लावली आहे. यामध्ये राहणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने लॉजिंग व्यावसायिकांना बरे दिवस आले आहेत. ब्रिटनमधून कोरोनाचे नवीन रुग्ण आढळू लागल्याने त्याचे सावट महानगरपालिकांमधील नागरिकांमध्ये आहे. त्याचा परिणाम यंदाच्या हंगामावर अजुनही आहे. तरीही लॉजिंगला राहणाऱ्यांची संख्या 80 ते 90 टक्‍के आहे. एमटीडीसीमध्येही राहणाऱ्यांचे प्रमाण चांगले आहे. यामधून गेल्या तीन दिवसांत एक कोटीपेक्षा अधिक उलाढाल झाली असावी, असा अंदाज आहे. 

कोरोनाचे सावट ख्रिसमसच्या सुट्टीवर आहे. दरवर्षीच्या मानाने यंदा कमी पर्यटक आले आहेत. गेल्यावर्षी गणपतीपुळेतील स्थिती ओव्हरफ्लो झाली होती. सध्या पुणे, मुंबईतील पर्यटकांचा ओढा इकडे सर्वाधिक आहे. 
-भालचंद्र नलावडे, व्यावसायिक 

निवास व्यवस्था असलेल्या व्यावसायिकांना कमी-जास्त प्रमाणात लाभ झालेला आहे. हा फ्लो 4 ते 5 जानेवारीपर्यंत राहील अशी शक्‍यता आहे. महानगरपालिकेत बंदी असल्यामुळे नववर्षासाठी गणपतीपुळेला प्राधान्य मिळेल अशी शक्‍यता आहे. 
-प्रमोद केळकर, लॉजिंग व्यावसायिक 

गोव्यात हाऊसफुल्लची पाटी.. 
अथांग समुद्र, मंदिरे, डोंगरदऱ्यामधून वसलेली टूमदार गावे आणि सर्वत्र हिरवाई असे वातावरण असलेल्या कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटकांची पसंती मिळत आहे. गोव्यात हाऊसफुल्लची पाटी लागली असून कोरोनामुळे पुणे, मुंबईतील पर्यटकांनी रत्नागिरी जिल्ह्यातील किनारी भागांना प्राधान्य दिले आहे. 

मास्क, सॅनिटायझरचाही विसर 
घोडे, उंट यावरुन किनाऱ्यावरील सैर, समुद्रात सफर यासह फोटो सेशन, नारळपाणी विकणाऱ्यांचे स्टॉल आणि विविध खाद्यपदार्थ विक्रेत्यांची चलती दिसत आहे. जलक्रीडांना मान्यता मिळाल्याने त्याचा फायदा व्यावसायिकांना होत आहे. किनाऱ्यावरील गर्दीमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला असून मास्क, सॅनिटायझरचाही विसर पडला आहे. 

संपादन- अर्चना बनगे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com