चिपळूण- शिवसेना कोणाच्या साथीने सत्तारूढ होणार?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 नोव्हेंबर 2016

निकालातून
* निकालाने राष्ट्रवादीला मोठा धक्‍का
* शिवसेनेने मारली बाजी
* भाजपची भूमिका महत्त्वाची ठरणार
* शाह, देवळेकर यांना पराभवाचा धक्‍का

निकालातून
* निकालाने राष्ट्रवादीला मोठा धक्‍का
* शिवसेनेने मारली बाजी
* भाजपची भूमिका महत्त्वाची ठरणार
* शाह, देवळेकर यांना पराभवाचा धक्‍का

चिपळूण : चिपळूण पालिकेतील राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि रमेश कदम यांचे आजवर असलेले वर्चस्व मोडून काढत शिवसेनेने 10 जागांवर विजय मिळवला. युती नसतानाही भाजपचे पाच उमेदवार विजयी झाले. शिवाय नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत सुरेखा खेराडे विजयी झाल्या. राष्ट्रवादीची पीछेहाट होत असताना आघाडी मोडून स्वबळावर लढण्याचा फायदा कॉंग्रेसला झाला. कॉंग्रेसचे 5, राष्ट्रवादीचे 4 आणि अपक्ष 2 उमेदवार निवडून आले. सत्तेवर कोणाला बसवायचे, हे आता भाजप ठरवू शकतो.

माजी उपनगराध्यक्ष लियाकत शाह व शिवसेनेचे गटनेते राजेंद्र देवळेकर यांना धक्‍कादायक पराभव पत्करावा लागला. प्रभाग दोन अ मध्ये भाजपचे संतोष टाकळे अवघ्या 4 मतांनी पराभूत झाले. त्याच प्रभागात भाजपच्या रसिका देवळेकर 5 मतांनी निवडून आल्या. शिवसेनेचे उमेश सकपाळ यांनी सर्वाधिक मताधिक्‍य घेतले. सुषमा कासेकर निवडून आल्या.
भाजपने पालिकेत आज इतिहास रचला. सौ. सुरेखा खेराडेंच्या रूपाने भाजपचा नगराध्यक्ष चिपळुणात प्रथमच निवडून आला आहे. नगराध्यक्षपदी शिवसेनेचाच उमेदवार निवडून येणार, अशी हवा होती. सर्वाधिक 10 जागा सेनेने जिंकल्या असल्या तरी अपेक्षित यशाने सेनेला हुलाकवणी दिली. एकहाती सत्तेचा दावा करणाऱ्या माजी आमदार रमेश कदम यांना चिपळूणकरांनी धक्‍का दिला. राष्ट्रवादीचे केवळ चार उमेदवार विजयी झाले. हक्काच्या प्रभागातील उमेदवारांनाही हार पत्कारावी लागली. गतवेळेस कॉंग्रेसचे केवळ तीन नगरसेवक होते. स्वबळावर लढताना कॉंग्रेसच्या खात्यात 2 नगरसेवकांची वाढ झाली. माजी उपगनराध्यक्ष लियाकत शाह यांचा पराभव कॉंग्रेसच्या जिव्हारी लागला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील लाथाळी आणि गेल्या पाच वर्षांतील कारभारात स्वपक्षीयांनी काढलेले सत्ताधाऱ्यांचे वाभाडे याचा चांगलाच फटका बसला. यामुळे रमेश कदम यांची जहागीरदारी संपुष्टात आली आहे.

भाजपचे प्रचारप्रमुख विजय चितळे, जिल्हाध्यक्ष बाळ माने यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठी मुसंडी मारली. सर्वच प्रभागात विरोधकांसमोर आव्हान निर्माण केले. शत प्रतिशत भाजपसाठी रवींद्र चव्हाण, विनोद तावडे या मंत्र्यासह भाजपचे अनेक नगरसेवक, नेते, कार्यकर्ते चिपळुणात ठाण बांधून बसले होते. प्रभावी संपर्क, हायटेक प्रचार आणि शहराची दुखरी नस ओळखून केलेला प्रचार भाजपला फलदायी ठरला.

पालिकेतील बलाबल
शिवसेना- 10
भाजप- 5
कॉंग्रेस- 5
राष्ट्रवादी- 4
अपक्ष - 2
नगराध्यक्ष- सुरेखा खेराडे (भाजप)

Web Title: curiosity about sena's choice of partner in chiploon