नोटाबंदीचा निकाल मतपेटीतून - शरद पवार

नोटाबंदीचा निकाल मतपेटीतून - शरद पवार

पिंपळगाव बसवंत - सामान्य माणूस देशाच्या हिताचा अधिक चांगल्या पद्धतीने विचार करतो. नोटाबंदीच्या निर्णयानंतर लोक शांत आहेत, याचा अर्थ ते वेडे नाहीत. सरकारचा निर्णय नोटाबंदीचा आहे की नसबंदीचा, याचा निकाल ते योग्यवेळी मतपेटीतून दिल्याशिवाय राहणार नाहीत, असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी पिंपळगाव बसवंत येथील शेतकरी मेळाव्यात दिला.

पिंपळगाव बसवंत येथील शरदचंद्र पवार कृषी उत्पन्न बाजार समितीचे भूमिपूजन व राष्ट्रवादी कॉंग्रेसने घेतलेल्या शेतकरी मेळाव्यात शरद पवार यांनी नर्मविनोदी शैलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला नोटाबंदीचा निर्णय, तसेच शेतकरीविरोधी धोरणाचा समाचार घेतला. भाषणाच्या सुरवातीलाच त्यांनी नोटाबंदीच्या निर्णयानंतर सामान्यांची स्वागत करण्याची प्रतिक्रिया ते सरकारने पुरेशा तयारीशिवाय घेतलेल्या निर्णयामुळे महिनाभरात बॅंकेतून पैसे मिळविण्यासाठी सोसावे लागणारे हाल, तसेच या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान याची व्यवहारातील उदाहरणे देऊन सरकारच्या या निर्णयाची अक्षरशः पिसे काढली.

'पंतप्रधानांनी नोटाबंदीचा निर्णय घेताना काळा पैसा उघड होईल, बनावट चलन रोखले जाईल, दहशतवादाला प्रतिबंध बसेल, अर्थव्यवस्थेला गती मिळेल, अशी कारणे दिली होती; परंतु या निर्णयामुळे शेतकरी, व्यापारी, उद्योजक, कामगार यापैकी कुणीही खुश नाही, मग नेमके खुश आहे तरी कोण?'' असा प्रश्‍न पवार यांनी उपस्थित केला. देशातील मोठ्या लोकसंख्येजवळ पैसा येतो व ते बाजारात खर्च करतात, तेव्हाच अर्थव्यवस्थेला गती येत असते; परंतु या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होणार आहे, असे त्यांनी सांगितले.

पवार म्हणाले, की सरकार आता "कॅशलेस' व्यवहारासाठी आवाहन करीत आहे, जगात "कॅशलेस' आहे, परंतु आपण अद्याप तेथपर्यंत पोचलेलोच नाही, त्यामुळे ही व्यवस्था आपल्या येथे यशस्वी होऊ शकणार नाही. या सरकारच्या दृष्टीने शेती हा दुय्यम दर्जाचा विषय आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी जाती-पाती विसरून शेतकरी हाच आमचा समाज व काळ्या आईशी इमान राखणारा आमचा भाऊ, अशी भूमिका घेण्याची वेळ आली आहे. प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, नाशिकचे प्रभारी जितेंद्र आव्हाड आदींची भाषणे झाली.

आता जमीन, सोने शोधणार
या निर्णयानंतर सरकार काय करणार, असे अर्थमंत्री जेटली यांना विचारले असता आता जमीन, सोने व घरांमध्ये अडकलेला काळा पैसा शोधणार, असे उत्तर त्यांनी दिल्याचे पवार यांनी सांगितले. ते म्हणाले, की आता दोन महिने नोटाबदलीच्या रागांनंतर आता ही नवीनच भानगड मागे लागणार आहे, असे दिसते. याबरोबरच हिवाळी अधिवेशनाच्या सांगतेप्रसंगी भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत खासदारांनाही तसे संकेत दिल्याचा दावा त्यांनी केला.

गडी बोलायला लई भारी!
पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण जोरात करतात. त्यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर असा धाडसी निर्णय घेतल्याबद्दल त्यांचे कौतुकही खूप झाले. असा निर्णय घेण्यासाठी 56 इंच छाती लागते, असे बोलले जाते, याचा संदर्भ देत पवार म्हणाले, ""गडी बोलायला लई भारी. पुण्याच्या भाषणात जेव्हा ते म्हणाले, की मी पवारांचे बोट धरून राजकारणात आलो, तेव्हा तर मी बघतच राहिलो.''

दोषींना फासावर लटकवा
नाशिकमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एक पदाधिकारी बनावट नोटा छपाईप्रकरणी अटकेत आहे. याचा संदर्भ देत पवार म्हणाले, मध्यंतरी नाशिकमध्ये घरात नोटा छपाई सुरू असल्याचे आढळले, अशांना पक्षात जागा नाही. दोषींना फासावर लटकवा. पक्षात येणाऱ्या प्रत्येकाची चौकशी होऊ शकत नाही; पण अशा व्यक्तींना केवळ पक्षातून हकालपट्टी करून चालणार नाही, तर त्यांना कायमचे आत पाठविले पाहिजे याची व्यवस्था करावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com