चलनटंचाईच्या झळा कायम...

चलनटंचाईच्या झळा कायम...

पाचशेच्या नोटा व्यवहारात कमी; पर्यटक, दुकानदार त्रस्त

सावंतवाडी - केंद्राच्या नोटाबंदीनंतर पन्नास दिवस उलटल्यावर परिस्थितीत सुधारणा होणार, असे वाटत असताना बाजारात चलनटंचाईची झळ आजही कायम असल्याचे चित्र आहे. बॅंकांमध्ये पाचशेच्या नोटा दाखल झाल्या असल्याचे सांगण्यात येत आहे; परंतु व्यवहारात हे चलन तुटपुंजेच असल्याचे चित्र आहे. शहरातील एटीएमची स्थितीही जैसे थेच आहे. सुट्या पैशांअभावी पर्यटक, दुकानदार, विक्रेत्यांच्या समस्या कायम आहेत.

आज एकूण ५३ दिवसांनंतरही आर्थिक व्यवहारात होणाऱ्या समस्या कायम आहेत. पाचशे व हजारांच्या नोटाबंदीनंतर २ हजाराची नवीन नोट दाखल झाली खरी; परंतु त्याचा आर्थिक देवघेवीत मदत म्हणून फारसा सकारात्मक परिणाम दिसून आलेला नाही. मोठ्या व्यवहारात त्याचे थोडेफार सहाय्य मात्र झाले. बॅंकांतील मोठ्या व्यवहारासाठी जमा करून ठेवलेल्या नोटांसाठी जागा मात्र कमी लागत होती. त्यात दुसरा फायदा म्हणजे मोठ्या व्यवहारात नोटा मोजताना वेळ वाचला जाऊ लागला आणि मोठे व्यवहार करता येणे सोपे झाले. दरम्यान, नोटाबंदीच्या परिणामामुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले असल्याचे चित्र होते. पेट्रोल पंप, पोस्ट, गॅस एजन्सीस, सार्वजनिक वाहतूक प्रवासातही जुन्या नोटा बंद झाल्यावर समस्यांत वाढच झाली. सर्वसामान्यांना हवालदिल होण्याची वेळ आली. पैसे नाहीत तर व्यवहार करावेत कसे आणि पैसे असूनही व्यवहार करावेत कसे असे बोलणारे लोकांचे जणू दोन गटच निर्माण झाले होते. आजही हे चित्र कायम आहे. 

दूरच्या प्रवासाला आलेल्या पर्यटकांना पेट्रोल भरण्यासाठी, राहण्याच्या व्यवस्थेसाठी व इतर पर्यटनविषयक सुविधा मिळविण्यासाठी पैशांअभावी समस्या निर्माण झाल्या. यात सर्वांसाठी कॅशलेस पद्धत ही एक समस्या कमी करणारी सुरक्षेची बाजू बनली; परंतु सुरवातीला कॅशलेस पद्घतीच्या प्रचार व प्रसारातच वेळ वाया जाऊ लागला. कॅशलेस पद्धत काही अंशी वेळ वाचविण्यासाठी फायदेशीर ठरली. पाचशेच्या नोटा पुरेशा वापरात आल्यास समस्या काही प्रमाणात कमी होऊन चलन टंचाई कमी होईल. तरीही सद्यःस्थिती सुधारण्यासाठी अजून काही कालावधी लागण्याची शक्‍यता आहे, असे बॅंक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

१० एटीएम मशीनमागे २ सुरू
एटीएम मशीनचा विचार करता लोकांना सुरवातीला एटीएम मशीनमध्ये पैसेच नसल्यामुळे बंद शटरच पाहायला मिळत होते. काही दिवसांनंतर परिस्थितीत सुधारणा होईल, असे वाटत होते. अंदाजे १० एटीएम मशीनमागे २ किंवा १ एटीएम मशीन चालू असल्याचे चित्र पाहायला मिळत होते. त्यात चालू एटीएमसमोर गर्दी असल्याने नागरिकांना बराच त्रास सोसावा लागला. पैसे काढण्यावर आलेली मर्यादा ही नागरिकांसाठी मोठी दुसरी डोकेदुखी ठरली. यात सर्वांत जास्त फटका हा पर्यटनावर झालेला दिसून आला. 

५०० च्या नोटा आहेत कुठे? 
बॅंकांत तसेच एटीएम मशीनमध्ये नव्या पाचशेच्या नोटा आल्या असल्याचे काही बॅंक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे; परंतु या नोटा काहींच्याच दृष्टीस पडल्या आहेत. यात बदल होणार केव्हा, असा सवाल सर्वच स्तरांतील नागरिकांतून उपस्थित होत आहे. पर्यटनावर आधारित असलेली वाहतूक व्यवस्था, स्थानिक विक्रेते, कामगार वर्ग असा सर्वांनाच हा त्रास सहन करावा लागला आहे. बॅंकांत दाखल झालेली नोट बाजारातील व्यवहारात वापरण्यात येत नाही तोपर्यंत समस्या कमी होणार नाही, असे चित्र आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com