रत्नागिरीत वाळू माफियांकडून वादळग्रस्तांची लूट

सचिन माळी  | Tuesday, 11 August 2020

वादळाने झोडल्यानंतर आता वाळू माफिया वाळूत लुटत असल्याचा गंभीर प्रकार घडत आहे. 

मंडणगड ( रत्नागिरी ) : वादळाने झोडल्यानंतर आता वाळू माफिया वाळूत लुटत असल्याचा गंभीर प्रकार सध्या मंडणगड तालुक्‍यात सुरू आहे. चक्रीवादळामुळे तालुक्‍यात घरे, गोठे, शाळा, शासकीय इमारती यांची पडझड झाली. त्यांच्या फेरउभारणीसाठी वाळू महत्त्वाचा घटक आहे. याचा गैरफायदा घेत वाळूचे दर वाढवले आहेत. हजार रुपये प्रति ब्रासवरून पाच हजार रुपये केली आहे. 

हेही वाचा - रत्नागिरीत मुर्तीकलेचा वारसा नसणारा कुंभार..

महिन्याभरापासून सुरू असलेले आंबेत मधील वाळू उत्खनन आता म्हाप्रळमध्येही सुरू केले आहे. प्रशासन याबाबत अनभिज्ञ असल्याचा आव आणत आहे. तर अधिकारीवर्ग खाडीच्या सीमांकनाचा मुद्दा उपस्थित करून कारवाई करण्याचे टाळत आहे. कोरोनामुळे प्रत्येक वाहन तपासून सोडणारे महसूल, पोलिस प्रशासनही या वाहनांची कोणतीही तपासणी न करता सोडत असते.

वाळू माफियांनी आंबेत पुलाखालीच वाळू उत्खनन सुरू केल्याने आंबेत पुलाच्या सूरक्षिततेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गेल्या आठ महिन्यांपासून आंबेत पूल दूरूस्तीच्या नावाखाली अवजड वाहतुकीसाठी बंद ठेवला आहे. मात्र या पुलावरून राजरोसपणे वाळूचे डंपर धावतात. रात्री बोटी भरून त्या म्हाप्रळ किनारी खाली करून रात्रीत वाळू वाहतूक सुरू आहे. 

हेही वाचा -  आता फक्त चिंगळांचाच आधार...

उत्खननाला परवानगी नाही तरीही

शासनाकडून रत्नागिरी जिल्हयात वाळू उत्खननाला परवानगी दिलेली नाही. लगतच्या रायगड जिल्ह्यात वाळू व्यवसाय सुरू असून तालुक्‍यात येणाऱ्या वाळूचे दर गगनाला भिडले आहे. सावित्री खाडीत कोणत्याही प्रकारे वाळू उत्खननाला परवानगी रायगड किंवा रत्नागिरी जिल्हाधिकारी यांनी दिलेली नाही. असे असताना दिवसाढवळ्या सावित्री खाडीत पंपाव्दारे वाळू उत्खनन सुरू आहे. 

संपादन - स्नेहल कदम