सावधान ! महा चक्रीवादळाचे सिंधुदुर्गावर सावट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असा सावधानतेचा इशारा दिला आहे. वातावरणातही बदल जाणवत आहेत. महा चक्रीवादळाच्या पार्श्‍वभूमीवर येथील अनेक मच्छीमारांनी नौका कोळंब खाडीसह, तळाशील येथे हलविण्यास सुरवात केली आहे.

मालवण / देवगड - क्‍यार चक्रीवादळाने हाहाकार उडविला असतानाच आता महाचक्रीवादळ सक्रिय होत असल्याने किनारपट्टी भागात पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दक्षिण पूर्व अरबी समुद्रात सक्रिय झालेल्या वादळामुळे किनारपट्टी भागात विजांसह मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.

मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असा सावधानतेचा इशारा दिला आहे. वातावरणातही बदल जाणवत आहेत. महा चक्रीवादळाच्या पार्श्‍वभूमीवर येथील अनेक मच्छीमारांनी नौका कोळंब खाडीसह, तळाशील येथे हलविण्यास सुरवात केली आहे. वादळाचा फारसा मोठा परिणाम किनारपट्टीवर होणार नाही केवळ मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज स्थानिक मच्छीमारांनी व्यक्त केला आहे. 

ऐन दिवाळीत क्‍यार चक्रीवादळाने जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात हाहाकार उडविला. यात किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांना मोठा फटका बसला. किनारपट्टी भागातील अनेक वस्त्यांमध्ये समुद्री उधाणाचे पाणी घुसले. मच्छीमारांच्या छोट्या होड्या, जाळ्या वाहून गेल्याने मच्छीमारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. दोन दिवसांपूर्वी क्‍यार चक्रीवादळ पुढे सरसावल्याने किनारपट्टी भागातील वादळाची परिस्थिती निवळली. ऐन दिवाळीत सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळलेल्या पावसामुळे सर्वत्र दाणादाण उडाली. यात मोठ्या प्रमाणात वित्तहानीच्या घटनाही घडल्या. यामुळे ऐन दिवाळीत सर्वांच्या उत्साहावर विरजण पडले. 

क्‍यार चक्रीवादळ निवळून दोन दिवस उलटत नाही तोपर्यंत महा चक्रीवादळ पुन्हा सक्रिय होत असल्याची माहिती मिळाल्याने किनारपट्टी भागात पुन्हा भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून काही मच्छीमारांनी आजच आपल्या नौका कोळंब खाडीसह परिसरात सुरक्षित ठिकाणी हलविल्या आहेत. आज सकाळपासून वातावरणातील उष्म्यात वाढ झाल्याचे चित्र होते. समुद्र शांत होता; मात्र सायंकाळी मुसळधार पाऊस कोसळला. रात्री उशिरापर्यंत ढगाळ वातावरण होते. 

महा चक्रीवादळ हे लक्षद्वीप क्षेत्र व नजीकच्या दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात सक्रिय झाले आहे. चक्रीवादळाचा जोर चार नोव्हेंबरपर्यंत राहणार आहे. हे चक्रीवादळ उत्तर-उत्तर पश्‍चिम दिशेने ताशी 22 किलोमीटर वेगाने मार्गक्रमण करत आहेत. त्यामुळे खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मासेमारी नौकांना तत्काळ बंदरात माघारी बोलावून घ्यावे. सद्यःस्थितीत किती नौका समुद्रात मासेमारीसाठी गेल्या आहेत त्याची माहिती मुख्य कार्यालय प्रादेशिक कार्यालय व नजीकच्या तटरक्षक दल कार्यालयास त्वरित द्यावी. नौका सुरक्षित बंदरात ठेवण्यासाठी मच्छीमारांना प्रवृत्त करावे जेणेकरून मच्छीमारांचे नुकसान होणार नाही अशा सूचना मत्स्य व्यवसाय विभागाच्या प्रादेशिक उपायुक्तांनी दिल्या आहेत. 

दरम्यान आज किनारपट्टीवर वातावरण पुन्हा पालटले असून ढगाळ वातावरणामुळे संभाव्य वादळी पावसाची शक्‍यता निर्माण झाली आहे. यापुर्वीच्या वादळी पावसाने झालेल्या नुकसानीतून सावरण्याआधी पुन्हा संकट ओढवण्याच्या भितीने शेतकरीही धास्तावले आहेत. पुन्हा जोरदार पावसाच्या शक्‍यतेने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळण्याची वेळ आली आहे. आज सकाळपासून किनारपट्टीवरील वातावरण पावसाळी बनले आहे. काळे ढग दाटून येऊन वादळी पावसाची चित्र दिसू लागले आहे. 

मच्छीमारीमध्ये व्यत्यय ! 

"क्‍यार' समुद्री वादळामुळे पावसाने जोर धरल्याने मध्यंतरी मच्छीमारी थंडावली होती. वादळाच्या शक्‍यतेने सुरक्षितता म्हणून येथील बंदरात जिल्हाभरासह परराज्यातील मच्छीमारी ट्रॉलर आश्रयाला आले होते. या काळात मच्छीमारी ठप्प झाली होती. आता पुन्हा महावादळाच्या शक्‍यतेने मच्छीमारीला ब्रेक लागण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांबरोबरच मच्छीमारही संकटात सापडण्याची लक्षणे आहेत. 

मोठा धोका नसल्याचा विश्‍वास 

महा चक्रीवादळ हे खोल समुद्रात असल्याने त्याचा जिल्ह्याच्या किनारपट्टीस मोठा धोका पोचण्याची शक्‍यता नाही. केवळ विजांसह मुसळधार पाऊस कोसळणार आहे. तरीसुद्धा मच्छीमार बांधवांनी खबरदारी घेण्यास सुरवात केली असल्याची माहिती स्थानिक पारंपरिक मच्छीमारांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cyclonic Storm Over Sindhudurg Once Again