PHOTOS : सायकल सवारीनेच रत्नागिरीला आली जाग

मकरंद पटवर्धन
रविवार, 8 डिसेंबर 2019

सायक्‍लोथॉनचे काटेकोर नियोजन डॉ. शिंदे दांपत्याने पार पाडले. याची पावती सकाळीच मिळाली. पोलिस अधीक्षक, आरटीओ, वाहतूक पोलिसांचेही या उपक्रमाकरिता सहकार्य लाभले. दहा नाक्‍यांवर 50 स्वयंसेवक, पाणी व्यवस्था, एनर्जी ड्रिंक, प्रथमोपचार, रुग्णवाहिका, टायरमध्ये हवा भरण्यासाठी पंप, सायकल दुरुस्तीपथक अशा जय्यत तयारीसह वाहतूक पोलिस, होमगार्ड आणि स्वयंसेवक कार्यरत होते.

रत्नागिरी - काळानुरूप काहीशा मागे पडलेल्या सायकल सवारीला रत्नागिरीमध्ये आज झळाळी आली. सायकलची उपयुक्तता आणि आरोग्य, पर्यावरणासाठी त्याचे होणारे फायदे याचा संदेश आज दणक्‍यात पार पडलेल्या सायक्‍लोथॉनने दिला. एकाच पद्धतीचे टी शर्ट परिधान केलेले सायकलस्वार पहाटे चक्कर मारीत असताना रत्नागिरीकरांना जाग आली त्यामुळे दिवसभर सायक्‍लोथॉनची चर्चा होती. यामुळे गेले दोन महिने रत्नागिरी सायकल क्‍लबने घेतलेल्या श्रमाचे चीज झाले, अशी कृतार्थतेची भावना डॉ. तोरल व डॉ. नीलेश शिंदे यांनी व्यक्त केली.

सायक्‍लोथॉनचे काटेकोर नियोजन डॉ. शिंदे दांपत्याने पार पाडले. याची पावती सकाळीच मिळाली. पोलिस अधीक्षक, आरटीओ, वाहतूक पोलिसांचेही या उपक्रमाकरिता सहकार्य लाभले. दहा नाक्‍यांवर 50 स्वयंसेवक, पाणी व्यवस्था, एनर्जी ड्रिंक, प्रथमोपचार, रुग्णवाहिका, टायरमध्ये हवा भरण्यासाठी पंप, सायकल दुरुस्तीपथक अशा जय्यत तयारीसह वाहतूक पोलिस, होमगार्ड आणि स्वयंसेवक कार्यरत होते. मिनीट टू मिनीट नियोजन, व्हॉट्‌सऍप ग्रुपद्वारे प्रत्येक ठिकाणची खबर मिळत होती. स्वतः 24 किमी सायकल सवारी करून वाटेत येणाऱ्या अडचणी जाणून त्यावर उपाययोजना क्‍लबने केल्या होत्या. सायक्‍लोथॉनमध्ये पोलिस, महसूल, कोषागार, जिल्हा परिषद, आरोग्य, कृषी आदी विभागांच्या प्रमुखांसह नामवंत उद्योजक, व्यावसायिकसुद्धा सहभागी झाले.

विविध संस्थांचे सहकार्य

सायक्‍लोथॉनला जाणीव फाउंडेशन, जायंट्‌स ग्रुप, क्रेडाई, लायन्स व लायनेस क्‍लब, आरंभ ग्रुप, जांभरूण युवक, राजरत्न प्रतिष्ठान, रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार संघ आदी सामाजिक संस्थांनी मदत केली. मॉन्स्टर ग्रुप, संतोष तावडे, गिरीश तावडे, राकेश नलावडे, नितीन दाढे, श्री. टिकेकर, श्री. नाचणकर, प्रदीप साळवी, अमरिश सावंत, एस. कुमार साऊंड सर्व्हिस, दीपक साळवी, हिंद सायकल मार्ट, सिद्धिविनायक कन्स्ट्रक्‍शन, गद्रे मरीन्स, निर्माण इन्फ्रास्ट्रक्‍चर, महेश गर्दे, उमेश महामुनी, सुशील जाधव, धरमसिंग चौहान, डॉ. किर्तीकुमार पिलणकर, सुयश भुर्के, चॉकलेट कॅफे, जेएसडब्ल्यू, मणेर सायकल मार्ट, श्रीकृष्ण डिस्ट्रीब्युटर्स आदींचेही सहकार्य लाभले.

भविष्यात अधिक उपक्रम

क्‍लबतर्फे सायकल शिकवणे, जानेवारीमध्ये गोवा ऑन सायकल, देश व परदेशात सायकल सफर असे उपक्रम राबवण्यात येणार आहेत. सायकल लायब्ररी करून भाड्याने सायकल देण्याचाही विचार चालू आहे. शहरात सायकलसाठी ट्रॅक असावा, याकरिता प्रयत्न आहेत, असे डॉ. नीलेश शिंदे यांनी सांगितले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cyclothon Arranged In Ratnagiri