दापोली रुग्णालय सलाईनवर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 जून 2017

वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता - दोन अधिकाऱ्यांवर भार

दाभोळ - दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयाची स्थिती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे हे रुग्णालयच ‘कोमा’मध्ये जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता - दोन अधिकाऱ्यांवर भार

दाभोळ - दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयाची स्थिती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे हे रुग्णालयच ‘कोमा’मध्ये जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक म्हणून डॉ. तुषार भागवत यांनी कार्यभार स्वीकारल्यावर रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली होती. दापोली तालुक्‍यात ८ प्राथमिक आरोग्य केंद्रे असूनही उपजिल्हा रुग्णालयात तालुक्‍यातील ग्रामीण भागाबरोबरच खेड व मंडणगड तालुक्‍यातील रुग्णही औषधोपचारासाठी येतात. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून या उपजिल्हा रुग्णालयाचीच प्रकृती ढासळू लागली आहे. डॉ. तुषार भागवत, डॉ. सुयोग भागवत (फिजिशियन), डॉ. श्रीकांत सूर्यवंशी, डॉ. सुहास मुळे, डॉ. रोशन उतेकर (कंत्राटी अस्थिरोगतज्ज्ञ) या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दापोली उपजिल्हा रुग्णालय सोडले असून; भूलतज्ज्ञ रामचंद्र लवटे यांची रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात बदली करण्यात आली आहे. आता उपजिल्हा रुग्णालयात केवळ दोनच वैद्यकीय अधिकारी उरले आहेत. त्यात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. बालाजी सगरे व डॉ. महेश भागवत यांचा समावेश आहे.

आयुष विभागातील डॉ. प्रदीप बनसोडे हे कंत्राटी स्वरूपात सेवा देत आहेत.  डॉ. सगरे व डॉ. भागवत या दोनच वैद्यकीय अधिकाऱ्यांवर प्रसूती, अपघातातील रुग्णांवर उपचार करणे, ओपीडीमधील रुग्ण तपासणे, शवविच्छेदन करणे आदी कामांचा ताण पडतो. वैद्यकीय अधिकाऱ्यांअभावी संध्याकाळची ओपीडी बंद होण्याची शक्‍यता आहे. त्याचा त्रास दूरवरून उपचारासाठी येणाऱ्या गरीब रुग्णांना होणार आहे. 

दापोलीबरोबरच खेड, मंडणगड तालुक्‍यातील मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात येतात. त्यामुळे रुग्ण तपासायचे की शवविच्छेदन करायचे हा प्रश्‍न वैद्यकीय अधिकाऱ्यांना पडला आहे. या रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकाच्या एका पदासह वैद्यकीय अधिकाऱ्यांची सहा पदे रिक्‍त आहेत. ही पदे धरून या रुग्णालयातील एकूण १८ पदे रिक्‍त आहेत. असे असूनही अनेक अडचणींवर मात करून उपजिल्हा रुग्णालयाने दोन वर्षे डॉ. आनंदीबाई जोशी पारितोषिक मिळवून जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. 

विस्तारही रखडला
या रुग्णालयातील वाढती रुग्णसंख्या पाहून राज्य शासनाने ५० खाटा असणाऱ्या या रुग्णालयाची श्रेणीवाढ करून या रुग्णालयाला १०० खाटांची परवानगी ३ वर्षांपूर्वीच दिली असून केवळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे वाढीव बांधकामाचे नकाशे, खर्चाचे अंदाजपत्रक सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्यापही दिले नसल्याने या रुग्णालयाचा कार्यविस्तार होऊ शकलेला नाही.

Web Title: dabhol konkan news dapoli hospital on saline