कर्जमाफी अर्ज भरण्याचे तीन तेरा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

दाभोळ - संथगतीने मिळणारी इंटरनेट सेवा व अनेक वेळा हॅंग होणारी शासनाची वेबसाईट यामुळे दापोली तालुक्‍यातील ऑनलाईन कर्जमाफी अर्ज भरण्याचे तीन तेरा वाजले असून १५ सप्टेंबरपूर्वी आपला अर्ज ऑनलाईन भरता येईल की नाही या काळजीने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

दाभोळ - संथगतीने मिळणारी इंटरनेट सेवा व अनेक वेळा हॅंग होणारी शासनाची वेबसाईट यामुळे दापोली तालुक्‍यातील ऑनलाईन कर्जमाफी अर्ज भरण्याचे तीन तेरा वाजले असून १५ सप्टेंबरपूर्वी आपला अर्ज ऑनलाईन भरता येईल की नाही या काळजीने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ अर्थात शेतकरी कर्जमाफी व प्रोत्साहनपर अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाचा पोर्टलवर जाऊन ऑनलाईन माहिती भरणे सक्‍तीचे करण्यात आले आहे. दापोली तालुक्‍यात रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या आर्थिक सहकार्याने तालुक्‍यातील ४१ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी शेतकऱ्यांना कृषी कर्जवाटप केले आहे. कृषी कर्जमाफी योजनेचा लाभ १ हजार ७५५ शेतकऱ्यांना मिळणार असून कर्जफेड केलेल्या ३ हजार ७२१ शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान योजनेचा लाभ मिळणार आहे. या सर्व ५ हजार ४७६ शेतकऱ्यांना कर्जमाफी व प्रोत्साहन अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज भरणे आवश्‍यक आहे. ऑनलाईन माहिती भरण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या दापोली, गावतळे व दाभोळ व पालगड येथे शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून गिम्हवणे व जालगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयातही ऑनलाईन अर्ज भरून देण्यात येतात, अशी माहिती जिल्हा बॅंकेचे अधिकारी भाऊ पुळेकर यांनी दिली. ऑनलाईन माहिती भरण्यासाठी जिल्हा बॅंकेच्या दापोली शाखेत गेले काही दिवस शेतकऱ्यांची तोबा गर्दी होत आहे. आतापर्यंत केवळ १ हजार शेतकऱ्यांनी ऑनलाईन माहिती भरली. उर्वरित साडेचार हजार शेतकऱ्यांची माहिती १५ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन कशी भरून होणार, याबाबत साशंकता आहे. शासनाने त्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

राष्ट्रीयीकृत बॅंकांबाबत माहिती नाही
तालुक्‍यातील राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून शेतीकर्ज किती शेतकऱ्यांनी घेतले आहे, त्यापैकी किती शेतकऱ्यांना या कर्जमाफी व प्रोत्साहन योजनेचा लाभ मिळणार आहे, याबाबत माहिती उपलब्ध झाली नाही. दरम्यान, जिल्हा उपनिबंधक (सहकार) बकुळा माळी यांनी जालगाव ग्रामपंचायतीला भेट देऊन तेथे कर्जमाफीसाठी ऑनलाईन माहिती भरून दिली जाणाऱ्या केंद्राला भेट देऊन येत असलेल्या अडचणींविषयी माहिती घेतली.

Web Title: dabhol konkan news loan waiver form issue