सेनेच्या दाभोळे गटालाही भाजपचा सुरुंग

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

देवरूख - कसबा, नावडी, कोसुंब जिल्हा परिषद गटापाठोपाठच भाजपने शिवसेनेच्या दाभोळे गटातही सुरुंग लावला आहे. या ठिकाणचे संपर्क नेते तुषार खेतल यांच्यासह प्रमुख पदाधिकारी भाजप प्रवेशाच्या रांगेत असून त्यांच्या प्रवेशाने सेनेला दाभोळे गटातही मोठे नुकसान सोसावे लागणार आहे.

दाभोळे गटातून माजी विभागप्रमुख सदा कांबळे यांच्या पत्नी सौ. कांबळे यांना, तर कोंडगाव पं.स. गणातून संतोष चव्हाण यांना उमेदवारी मिळावी, अशी मागणी संपर्क नेते तुषार खेतल यांनी शिवसेनेकडे केली होती.

शिवसेनेची यादी जाहीर झाल्यावर खेतल यांच्या मागणीला केराची टोपली दाखवण्यात आल्याचे स्पष्ट झाले. दाभोळे गटातून भाजपमधून आयात केलेल्या रजनी चिंगळे यांना, तर कोंडगाव गणातून जया माने आणि दाभोळे गणातून संजय कांबळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. संपूर्ण गटावर आमदार राजन साळवी समर्थकांचाच भरणा करण्यात आल्याने संपर्क नेते तुषार खेतल नाराज झाले आहेत. त्यांच्यासह माजी उपतालुकाप्रमुख आणि साखरपा विभागातील ज्येष्ठ नेते संजय गांधी, संतोष चव्हाण यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. या सर्वांचे शेकडो समर्थकही सेनेला राम राम करण्याच्या तयारीत आहेत. शिवसेनेला सोडचिठ्ठी दिल्यावर हे तिघेही भाजप प्रवेशासाठी तातडीने मुंबईत रवाना झाले आहेत. भाजप प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्हाध्यक्ष बाळ माने यांच्या उपस्थितीत या सर्वांचा भाजपमध्ये पावन करून घेतले जाणार आहे. या घडामोडींमुळे शिवसेना आणखीन बॅकफूटला येणार आहे.

शिवसेनेच्या एकेक गडाला खिंडार
सेनेच्या एकेका गडाला खिंडार पाडण्याचे काम भाजपने काही महिन्यांपूर्वीच सुरू केले होते. यामध्ये कसबा गट लक्ष्य करण्यात आला होता. त्यापाठोपाठ जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत साळुंखे यांनी कडवई गटातही सेनेला धोबीपछाड दिली आहे. त्यानंतर राजेश मुकादम यांनी कसबा व नावडी गटात सेनेला चांगलाच धक्‍का दिला, तर काल रात्री प्रमोद अधटराव यांनी कोसुंब गटातून धक्‍कातंत्राचा अवलंब केला. या स्थितीत संपर्क नेते तुषार खेतल व सहकाऱ्यांनी दाभोळेतही तोच कित्ता गिरवल्याने तालुक्‍यातील शिवसेना आता फुटीच्या उंबरठ्यावर आली आहे.

Web Title: dabhol shivsena group break by bjp