वरवडे - पडवणेवाडीचा साकव मृत्यूचा सापळा

राजेश कळंबटे
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

रत्नागिरी - तालुक्यातील वरवडे येथील पडवणेवाडीकडे जाण्यासाठीचा लोखंडी साकव नादुरुस्त झाला आहे. वाडीकडे जाणारा एकमेव मार्ग असल्यामुळे धोका पत्करुन विद्यार्थी आणि ग्रामस्थ त्यावरुन मार्गक्रमण करीत आहे. हा साकव पादचार्‍यांसाठी मृत्यूचा सापळा बनलेला आहे.

रत्नागिरी - तालुक्यातील वरवडे येथील पडवणेवाडीकडे जाण्यासाठीचा लोखंडी साकव नादुरुस्त झाला आहे. वाडीकडे जाणारा एकमेव मार्ग असल्यामुळे धोका पत्करुन विद्यार्थी आणि ग्रामस्थ त्यावरुन मार्गक्रमण करीत आहे. हा साकव पादचार्‍यांसाठी मृत्यूचा सापळा बनलेला आहे.

हा साकव बांधून बराच कालावधी झालेला आहे. समुद्राचे पाणी खाडीत भरल्यानंतर तसेच पावसाळ्यात पूर्णवेळ या साकवाचा वापर करावा लागतो. वाडीच्या पलिकडे रस्त्याच्या बाजूला पिण्याच्या पाण्याची विहीर आहे. पाण्यासाठी लोकांना या साकवाचा वापर करावा लागतो. तसेच विद्यार्थीही याच मार्गाचा वापर करतात. समुद्राची खारी हवा याने लोखंडी स्ट्रक्चर व त्यावरील सिमेंट शिटस् यावर त्याचा परिणाम होऊन हा साकव नादुरुस्त झाला आहे.

यासंदर्भात वरवडे ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता यांच्याकडे दुरुस्तीची मागणी केली होती. बांधकाम खात्याकडून त्यावर अद्यापही कार्यवाही झालेली नाही. काही दिवसांपूर्वी साकवावरुन जाताना पाय अडकून एका मुलीला दुखापतही झाली होती. त्यानंतरही ग्रामपंचायतीने पाठपुरावा केला. तरीही बांधकाम विभागाला जाग आलेली नाही. त्यामुळे या साकवावरुन जाताना होणार्‍या दुर्घटनांचे प्रकार सुरु आहेत. आणखीन एका महिलेला दुखापत झाली आहे.

पावसाळ्यापूर्वी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून सर्व्हेक्षण करण्यात आले होते; परंतु या साकवाची दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे ग्रामस्थ संतापले असून जीवावर बेतणारा प्रसंग घडल्याशिवाय प्रशासन यावर कार्यवाही करणार नाही का असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

साकवाची दुरुस्ती वेळेत झाली नाही तर, वरवडे ग्रामस्थ जनआंदोलन करतील. त्याची सर्वस्व जबाबदारी प्रशासनाची राहणार आहे.

- निखिल बोरकर, सदस्य, ग्रामपंचायत

 

Web Title: dangerous bridge Varvade Padavnewadi