दापोली विधानसभेसाठी कुणबी समाजाचा स्वतंत्र उमेदवार ?

दापोली विधानसभेसाठी कुणबी समाजाचा स्वतंत्र उमेदवार ?

दाभोळ - लोकसभेच्या निवडणूक निकालात दापोली विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा कुणबी फॅक्‍टर प्रभावी ठरला. राजकीय पक्षांनी समाजाला उमेदवारी न दिल्यास कुणबी समाजाचा स्वतंत्र उमेदवार उभा करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. या सर्व प्रक्रियेमध्ये तरुणांचा मोठा सहभाग असल्याने कुणबी समाजातील विविध राजकीय पदाधिकाऱ्यांना आमदारकीचे वेध लागले आहेत. 

दापोली विधानसभा मतदारसंघात लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांना तब्बल 15 हजारांचे मताधिक्‍य मिळाले. यामध्ये कुणबी वस्ती असणाऱ्या अनेक गावांमधून गीते यांना चांगले मतदान झाल्याचे दिसून आले आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत कुणबी समाजप्रणीत उमेदवार शशिकांत धाडवे यांनीही निवडणूक लढवून तब्बल 20 हजार मते मिळविली होती. त्यामुळे सलग 5 वेळा आमदारकी भूषविणाऱ्या सूर्यकांत दळवींचा पराभव झाला होता व मतविभाजन झाल्याने राष्ट्रवादीचे संजय कदम विजयी झाले होते. 

जिंकून येण्याची ताकद असतानाही येथील कुणबी समाज हा विविध राजकीय पक्षांत विखुरला गेल्यानेच राजकीय पक्षांचा फायदा होत असल्याचे समाजस्तरावर बोलले जात असून कट्टर राजकीय मंडळी निवडणुकीच्या धामधुमीत मदत करत नसल्याचे कट्टर समाजप्रेमींमधून सांगितले जात आहे. त्यामुळेच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत कुणबी समाजाचे उमेदवार कमी प्रमाणात निवडून येत आहेत. गेली अनेक वर्षे कुणबी समाजाचा आमदार नसल्याने कुणबी भवनासारखे विविध प्रश्‍न प्रलंबित राहिले आहेत. तसेच समाजातील अंतर्गत दुहीचा फायदाही अन्य राजकीय पक्षांनी उचलला आहे.

कुणबी समाजातील तरुणांना आजही रोजगारासाठी मुंबईची वाट धरावी लागत असल्याने तालुक्‍यामधील विविध गावांमध्ये केवळ वयस्कर मंडळीच घर राखण्यासाठी गावात राहिलेली दिसून येत आहे. दापोली विधानसभा मतदारसंघात सध्याची राजकीय परिस्थिती पाहता शिवसेनेकडून युवानेते योगेश कदम, राष्ट्रवादीकडून आमदार संजय कदम हे निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. 

निवडणूक सोपी जाणार नाही 
राजकीय पक्षांनी कुणबी समाजाच्या व्यक्‍तीला उमेदवारी द्यावी, अशी मागणी विविध समाज माध्यमांवर केली जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत कुणबी समाजाने आपला स्वतंत्र उमेदवार उभा केल्यास ही निवडणूक राजकीय पक्षांना सोपी जाणार नसल्याची चिन्हे दिसत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com