जानेवारीतच मिळाले काजू बी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

दापोली - तालुक्‍यातील मळे येथील प्रगतशील शेतकरी सुनील देवजी फिलसे यांनी चार वर्षांपूर्वी लागवड केलेल्या काजू कलमांना लागलेली काजू बी जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात तयार झाली. पहिल्या टप्प्यातील काढणीत सुमारे ७० किलो काजू  बीचे उत्पन्न मिळाले आहे. 

दापोली - तालुक्‍यातील मळे येथील प्रगतशील शेतकरी सुनील देवजी फिलसे यांनी चार वर्षांपूर्वी लागवड केलेल्या काजू कलमांना लागलेली काजू बी जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात तयार झाली. पहिल्या टप्प्यातील काढणीत सुमारे ७० किलो काजू  बीचे उत्पन्न मिळाले आहे. 

मळे (ता. दापोली) येथील देवजी फिलसे यांची वडिलोपार्जित भातशेती. आंबा कलम व काजू बाग, सुपारी बाग अशी विविध प्रकारची लागवड असून याच उत्पन्नातून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. फिलसे यांची  याशिवाय गावात सुमारे दहा ते बारा एकर जांभा कातळयुक्त  जमीन आहे. वर्षानुवर्षे ओसाड जमिनीत झाडे-झुडपांचे साम्राज्य तयार झाले होते. मात्र देवजी फिलसे यांचा मोठा मुलगा सुनील याने चार वर्षांपूर्वी या जमिनीपैकी सुमारे पाच एकर जमिनीची साफसफाई करून वेंगुर्ला ४ व वेंगुर्ला ७ या जातीच्या काजू कलमांची लागवड करण्याचा निर्णय घेतला. २० बाय २० फुटावर लागवड केली. पारंपरिक व उपजत शेतीच्या ज्ञानावर त्यांनी ४०० काजूची लागवड केली. या वर्षी प्रथमच या काजूच्या झाडांना मोहोर येऊन ७० किलो काजू बीचे उत्पादन मिळाले आहे. सुनील फिलसे यांनी लागवडी नंतर रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रिय खतांना प्राधान्य दिले आहे. गावातील इतर अनेक शेतकऱ्यांच्या कातळाच्या जमिनी पडीक असतानाही आपल्या कातळ जमिनीत खड्डे मारून त्यामध्ये बाहेरून आणलेली माती टाकून काजू कलमांची लागवड केली. यामुळे अवघ्या चार वर्षातच या कलामांपासून उत्पन्न मिळण्यास सुरुवात झाली आहे.

फिलसेंनी दाखवली वाट
वन्यप्राणी आणि माकडांचा उपद्रव यामुळे कोकणातील अनेक शेतकरी आपल्या जमिनी पडीक ठेवू लागले आहेत. पुणे मुंबई येथे कमी पगारात नोकरी करण्यात येथील शिक्षित व अल्पशिक्षित  तरुण समाधान मानतो आणि तेथेच स्थायिक होण्यासाठी गावातील वडिलोपार्जित जमिनी विकण्यात पुढाकार घेतो. या सर्व पार्श्वभूमीवर सुनील फिलसे यांनी कातळाच्या जमिनीत काजूची बाग फुलवून येथील शेतीकडे दुर्लक्ष करणाऱ्या तरुणांसमोर नवीन आदर्श निर्माण केला आहे.

काजूगराला मिळणारा वाढता भाव तसेच आंबा कलमांपेक्षा लागणारे कमी पाणी, करावी लागणारी कमी मेहनत यामुळे पडीक असलेल्या जमिनीत काजू लागवड करण्याचा निर्णय घेतला. तरुण शेतकऱ्यांनी आपली मानसिकता बदलून शेतीकडे लक्ष दिले पाहिजे. जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर यामधून नक्कीच चांगले उत्पन्न मिळू शकेल.
- सुनील फिलसे, आंबा व काजू बागायतदार

Web Title: dapoli konkan news cashew seed