रस्त्याअभावी देवाचा डोंगर पर्यटन दूरच

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन देवाचा डोंगर येथे जाणाऱ्या रस्त्याचे काम लवकरात लवकर मार्गी लावून येथील रहिवाशांना दिलासा द्यावा.
- काशीनाथ झोरे, देवाचा डोंगर, दापोली

दापोली - निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले दापोली तालुक्‍याचे शेवटचे टोक समजले जाणारे देवाचा डोंगर. या गावाकडे जाण्यास दळणवळणासाठी सुरळीत रस्ताच नसल्याने गावाचा विकास रखडला आहे. डोंगरदऱ्यातून दोन हात करीत येथील नागरिक खडतर जीवन जगत आहेत.  

दोन जिल्हे आणि चार तालुके यांच्या मध्यावर हा गाव आहे. गावामध्ये धनगर वस्ती मोठ्या प्रमाणात आहे. इतिहासाची साक्ष असलेला देवाचा डोंगर या भागाला पर्यटनाचा दर्जा मिळूनही पर्यटकांसाठी प्राथमिक सुविधाही नाहीत. विकासासाठी प्रशासन प्रयत्न करीत नसल्याने येथील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.   गावाच्या विकासासाठी येथील ग्रामस्थ अनेक वर्षांपासून संघर्ष करीत आहेत. शंभरहून अधिक घरे असून पर्यटनाचा दर्जा मिळूनही सोयीसुविधांअभावी गाव अद्याप मागेच आहे. दळणवळणासाठी सुरळीत रस्ता नसल्याने येथील जनजीवन विस्कळित झाले आहे. चिंचाळी-जामगे या गावातील मार्गाने देवाचा डोंगरकडे जाण्यासाठी रस्ता आहे; मात्र तो चांगल्या स्थितीत नाही. त्यामुळे ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. खराब असलेला हा रस्ता कधी पूर्ण होणार याची ग्रामस्थ आतुरतेने वाट बघत आहेत.      

वीज, पाणी, प्राथमिक शाळा, या सुविधांव्यतिरिक्त गावामध्ये कोणत्याही जीवनावश्‍यक गोष्टींची पूर्तता झालेली नाही. दैनंदिन गरजेच्या वस्तूंसाठी त्यांना पालगड, दापोली, मंडणगड, खेड, महाड या ठिकाणी जाण्यासाठी दहा ते पंधरा किमी डोंगरदऱ्यातून पायपीट करावी लागते.  या रस्त्याला मोठ्या निधीची गरज असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जाते. या गावाला समस्यामुक्त करण्यासाठी वाहतुकीस योग्य असा रस्ता करण्याची मागणी ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे. पर्यटनस्थळी स्वयंभू शंकर मंदिर आहे. हे मंदिर दोन जिल्ह्यांच्या आणि चार तालुक्‍यांच्या मध्यभागी आहे. येथून रायगड-प्रतापगड किल्ले दिसतात. या गावाच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्यास पर्यटनालाही चालना मिळेल. देवाचा डोंगर या पर्यटन क्षेत्राकडे जाणारा रस्ता तीव्र चढाव आणि अरुंद असल्याने ग्रामस्थांना दळणवळणासाठी अडचणींचा  ठरत आहे. 

Web Title: dapoli news konkan tourist