दापोलीचे शिवाजीनगर गाव राज्यात दुसरे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 ऑगस्ट 2016

चिपळूण- दापोली तालुक्‍यातील शिवाजीनगर गाव संततुकाराम वनग्राम योजनेत राज्यात दुसरे आले आहे. शुक्रवारी

(ता.29 ) नागपूर येथे या गावाचा गौरव करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय वनाधिकारी विकास जगताप यांनी "सकाळ‘ला दिली. 

चिपळूण- दापोली तालुक्‍यातील शिवाजीनगर गाव संततुकाराम वनग्राम योजनेत राज्यात दुसरे आले आहे. शुक्रवारी

(ता.29 ) नागपूर येथे या गावाचा गौरव करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय वनाधिकारी विकास जगताप यांनी "सकाळ‘ला दिली. 

दापोली शहरापासून 5 किमीवर जैवविविधतेने नटलेले शिवाजीनगर गाव आहे. 1100 लोकवस्तीचे पाच वाड्यांमध्ये विभागलेल्या या गावात समृद्ध वनसंपदा आहे. वन विभागातर्फे 2013 मध्ये गावात संयुक्त वनव्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली. 22 सदस्य संख्या असलेल्या या समितीत 9 महिलांचा समावेश आहे. या समितीतर्फे सन 2013-14 मध्ये 25 हेक्‍टर क्षेत्रावर ग्रामस्थांच्या मदतीने विविध कामे करण्यात आली. शिवाजीनगरचे ग्रामस्थ आणि वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वनक्षेत्राची हद्द स्वच्छ करण्यात आली. बुरूज दुरुस्ती, जाळरेषा, वनाचे संरक्षण व संवर्धन, अवैध तोड, शिकार, चराईला प्रतिबंध करणे, वनक्षेत्रावरील अतिक्रमणास प्रतिबंध करणे, वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी वनातील पाणवठ्यांची स्वच्छता करणे, कच्चे बंधारे बांधणे ही कामे श्रमदानातून करण्यात आली. ग्रामस्थांच्या मदतीने वनसंरक्षणाचे काम वन विभागाकडून सुरू आहे. 

विपूल नैसर्गिक वनसंपदेने असलेल्या या गावात बिबट्या, मोर, ससा, खवलेमांजर, रानमांजर, वानर, मुंगुस, सालींदर, कोल्हा, तरस, रानडुक्कर, चौशिंगा गवे, भेकर, सांबरसह वेगवेगळ्या प्रकारचे पशुपक्षी आहेत. गावात क्षेत्रपाल हे ऐतिहासिक 300 वर्षापूर्वीचे जागृत देवस्थान आहे. गावचे भौगोलिक क्षेत्र 536.91.4 हेक्‍टर आहे. त्यात 86.55 हेक्‍टर वनक्षेत्र आहे. साग, एैन, किंजळ, नाना, आंबा, उंबर, सावर, भेळा, हेद, गेळा, आसाना, बिवळा, सात्वीण, पळस, हिरडा, शिरस, करक, आपटा, जांभूळ, कुंभा, कैर, आवळा, बांबू आदी प्रजातीचे वृक्ष आणि वेली मोठ्या प्रमाणावर आहेत.
संत तुकाराम वनग्राम योजनेचे सर्व निकष पूर्ण केलेल्या या गावाची 2014-15 साली जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकासाठी निवड झाली होती. त्यानंतर राज्यस्तरीय क्रमांकासाठी गावाची निवड झाली होती. त्यात शिवाजीनगरला दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. 

Web Title: Dapoli Shivajinagar village Got 2nd Number