दापोलीत हुडहुडीनेही बागायतदार सुखावले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016

या वर्षी पाऊसही चांगला झाला आहे. वातावरणात थंडीची सुरवात योग्य वेळी झाल्याने गतवर्षीपेक्षा हा मोसम आंबा बागायतदारांना चांगले उत्पन्न मिळवून देईल.
- सागर मयेकर, आंबा बागायतदार, हर्णै

दापोली : तालुक्‍यात गेले पाच दिवस पडणाऱ्या थंडीने दापोलीवासीय गारठून गेले आहेत. कोकणचे मिनी महाबळेश्‍वर हे नाव दापोलीत सध्या सार्थ होत आहे. सकाळी दाट धुके पडत असून, रात्रीचे तापमानही घसरले आहे. त्यामुळे थंडीमुळे आंबा कलमांना पालवी येऊ लागल्याने बागायतदारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पारा 13 अंशांवर घसरला आहे.

ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात काही काळ हजेरी लावणाऱ्या पावसामुळे शेतकरी हैराण झाला होता; मात्र दसऱ्याच्या सुमारास पाऊस गायब झाल्याने थंडीची चाहूल सुरू झाली. या वर्षी ऑक्‍टोबर हीटचा परिणाम जाणवला नाही; मात्र नोव्हेंबरच्या सुरवातीपासूनच थंडीला चांगली सुरवात झाली आहे. या वर्षी पावसाने वेळीच आवरते घेतल्याने भातशेती कापणीच्या कामात शेतकरी गुंतला आहे. गेल्या चार-पाच दिवसांत सायंकाळी सहाच्या सुमारास वातावरणात थंडावा जाणवतो व पुढे तो वाढत जातो.
दरम्यान, थंडीमुळे तालुक्‍यातील बागायतदार सुखावले आहेत. आंबा, काजू यांसारख्या पिकांना चांगला मोहोर येण्यासाठी थंडीची आवश्‍यकता असते. बागायतदारांचे अर्थकारण या थंडीवर अवलंबून असल्याने बागायतदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आंबा कलमांना मोठ्या प्रमाणात पालवी आल्याने आंबा हंगामाची चाहूल लागली आहे.
दरम्यान, सकाळी अकरानंतर कडकडीत ऊन पडत असल्याने असह्य उकाडा होत असला, तरी सायंकाळी सहानंतर गार वारे आणि तापमान खाली येत आहे. गेल्या आठ दिवसांत कमाल तापमान 35 अंशांपर्यंत होते. त्याच वेळी रात्रीचे तापमान मात्र 13 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे.

दापोली तालुक्‍यातील तापमान
तारीख कमाल किमान
21 ऑक्‍टोबर- 33.8 20.5
24 ऑक्‍टोबर- 31.8 23.5
26 ऑक्‍टोबर- 31.2 17.5
27 ऑक्‍टोबर- 32.4 17.5
28 ऑक्‍टोबर- 33.8 15.5
2 नोव्हेंबर- 35.6 17.00
5 नोव्हेंबर- 33.0 13.00

Web Title: dapoli shivers with cold