मालवण किनार्‍यावर कामगाराचा मृतदेह

प्रशांत हिंदळेकर
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

मालवण - मासळी उतरविण्याच्या कामास आलेल्या एका कामगाराचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह आज सकाळी गवंडीवाडा येथील किनार्‍यावर स्थानिकांना आढळून आला. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. मृतदेहाच्या अंगावर पायास व डोक्यास जखमा तसेच व्रण असल्याचे दिसून आले. त्याचे अन्य तीन साथीदार पसार झाल्याने त्याचा खून करण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे. 

दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिस तसेच कणकवली येथील आय-बाईक हे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. पुढील तपास उशिरापर्यंत सुरू होता. 

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी- शहरातील बाजारपेठेतील एका चायनीज सेंटरवर कामास असलेल्या एका कामगाराने डोंबिवली नाका येथून चार कामगारांना मासळी उतरविण्याच्या कामासाठी 3 तारखेला येथे आणले होते. मत्स्य व्यावसायिक लीलाधर पराडकर यांच्याकडे ते मासळी चढविणे व उतरविण्याचे काम गेले तीन दिवस करत होते. मात्र यातील दोन कामगारांना दारू पिण्याचे व्यसन असल्याने तसेच ते काम करण्यास योग्य नसल्याचे दिसून आल्याने काल रात्री श्री. पराडकर यांनी त्या दोघांना पैसे देत जेवण करून तुम्ही तुमच्या गावी जा असे सांगितले होते. यातील एका कामगाराचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह सकाळी गवंडीवाडा येथील किनार्‍यावर स्थानिक मच्छीमारांना आढळून आला. त्याला ओढत किनार्‍यावर आणून टाकल्याच्या खुणा किनार्‍यावर असल्याने या घटनेची माहिती स्थानिकांनी पोलिसांना देताच पोलिस निरीक्षक विनीत चौधरी, पोलिस उपनिरीक्षक डॉ. बालाजी सवंडकर, संतोष गलोले, सुनील पवार, आशिष भाबल हे घटनास्थळी दाखल झाले. या प्रकाराची माहिती मिळताच उपनगराध्यक्ष राजन वराडकर, लीलाधर पराडकर, शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्यासह अन्य मच्छीमारांनी घटनास्थळी धाव घेतली होती. 

मृतदेह मिळालेल्या व्यक्तीचे नाव दिलीप (पूर्ण नाव माहित नाही) असल्याची माहिती मिळाली. मात्र गवंडीवाडा येथे ज्याठिकाणी चार कामगार वास्तव्यास होते त्याठिकाणी पाहणी केली असता त्याचे अन्य तीन साथीदार पसार असल्याचे दिसून आले. कामगाराच्या पोटावर, पाठीवर, पायावर जखमा तसेच डोक्यास जखम असल्याने त्याचा खून करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ कणकवली येथील आय-बाईक या पथकास घटनास्थळी पाचारण केले. दुपारी घटनास्थळी दाखल झालेल्या या पथकाकडून रक्ताचे डाग तसेच ते वास्तव्यास असलेल्या खोलीची तपासणी करण्यात आली.

चायनीज सेंटरवरील ज्या कामगाराने त्या चार कामगारांना डोबिंवली नाका येथून येथे आणले त्या कामगारास या चारही जणांची चांगली ओळख नसल्याने तसेच तीन दिवसांपूर्वीच ते येथे आले असल्याने मृतदेह सापडलेल्या कामगाराचे तसेच त्याच्या साथीदारांची पूर्ण नावे न मिळता केवळ तो मृतदेह दिलीप नावाच्या व्यक्तीचा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे त्या कामगारांचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू होते. 

Web Title: dead body of worker on Malvan coast