रत्नागिरी - गौतमी खाडीकिनारी मृत माशांचा खच 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 एप्रिल 2019

एक नजर

  • पावस येथील भाटीवाडी परिसरातील गौतमी खाडीकिनारी मृत माशांचा खच. 
  • खाडीतील पाण्यामध्ये रासायनिक द्रव्याचा मोठा तवंग.
  • या द्रव्याचा परिणाम होऊन मासे मृत झाल्याचे स्थानिकांचे मत.
  • ओहोटीमुळे खाडीतील पाणी कमी होऊन उष्म्यामुळे मासे मृत झाल्याचा मत्स्य व्यवसाय खात्याचा अंदाज. 

पावस - येथील भाटीवाडी परिसरातील गौतमी खाडीकिनारी मृत माशांचा खच आढळून आला. खाडीतील पाण्यामध्ये रासायनिक द्रव्याचा मोठा तवंग दिसत होता. या द्रव्याचा परिणाम होऊन मासे मृत झाल्याचे स्थानिकांचे मत आहे. ओहोटीमुळे खाडीतील पाणी कमी होऊन उष्म्यामुळे मासे मृत झाल्याचा मत्स्य व्यवसाय खात्याचा अंदाज आहे. मात्र आजूबाजूच्या समुद्र किनाऱ्यावर मृत मासे आढळून आलेले नाहीत. 

गौतमी खाडी व रनपार जेटी दरम्यान समुद्रकिनारी भाटीवाडी परिसर आहे. अनेक मच्छीमार या भागात मासेमारीचा व्यवसाय करतात. काहीजण आपल्या उदरनिर्वाहसाठी मासेमारी करतात. समुद्रातील अंतर्गत हालचाली व बदलामुळे समुद्रकिनारी व खाडीतील पाण्यामध्ये बदल होऊन मासे मृत होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. आज सकाळी खाडीकिनारी दुर्गंधी पसरली होती. अनेक नागरिक खाडीकिनारी आल्यानंतर त्यांना किनाऱ्यावर मृत माशांचा खच आढळला. ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरल्यावर अनेकांनी खाडीकिनारी धाव घेलली. सहज मासे मिळाल्याने काही जणांनी त्याचा फायदा घेतला. ते मच्छी मार्केटला विकण्यासाठी घेऊन गेले. 

तेथील जागरूक नागरिक रूपेश अशोक कीर यांनी मृत मासे हाताळत ते उलटे करून पाहिले. तर माशाच्या तोंडातून हिरव्या रंगाचे द्रव्य बाहेर येत होते. मासे खाण्यास अयोग्य असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी स्थानिकांना पोटतिडकीने सांगितले. तेव्हा नागरिकांनी हे मासे किनाऱ्यावर टाकले. खाडीतील पाण्यावर हिरवा आणि निळसर रंगाचा तवंग दिसत होता. तातडीने पावसचे तलाठी भातडे यांनी खाडीकिनारी जाऊन पावस, गणेशगुळे, कुर्धे, मेर्वी, पूर्णगड परिसरात भेट दिली. किनाऱ्यांची पाहणी केली असता, असा तवंग किंवा मृत मासे दिसले नाहीत. 

भाटीवाडी परिसरातील गौतमी खाडीकिनारी आमच्या दोन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली. तेव्हा पाण्यात रासायनिक द्रव्याचा तवंग पसरल्याचे दिसून आले. या द्रव्याचा माशांवर मोठा परिणाम झाला. त्यात ओहोटीवेळी अचानक पाणी कमी झाले. प्रचंड उष्मा असल्याने कमी पाण्यातील ऑक्‍सिजन संपल्याने मासे मृत झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हे मासे खाडीतील आहेत, समुद्रातील नाहीत. 

- आनंद पालव, सहायक मत्स्य आयुक्त, रत्नागिरीे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dead Fishes found on Goutami Beach in Ratnagiri