esakal | कळंबस्ते-तेलेवाडीत पडक्‍या विहिरीत सापडला मृत बिबट्या

बोलून बातमी शोधा

Dead leopard found in well kokan marathi news

भक्ष्याचा पाठलाग करताना दुर्घटना; ग्रामस्थांच्या मदतीने पंचनाम्यानंतर दहन

कळंबस्ते-तेलेवाडीत पडक्‍या विहिरीत सापडला मृत बिबट्या
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

साडवली (रत्नागिरी) : संगमेश्‍वर तालुक्‍यातील कळंबस्ते-तेलेवाडी येथील एका पडक्‍या विहिरीत मादी जातीचा बिबट्या मृतावस्थेत सोमवारी (ता. १२) सापडला. भक्ष्याचा पाठलाग करताना हा बिबट्या विहिरीत पडल्याचा अंदाज वन विभागाने व्यक्‍त केला. वन विभाग व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्याला बाहेर काढून पंचनामा केल्यानंतर अग्नी देण्यात आला. 

तालुक्‍यातील कळंबस्ते-तेलेवाडी येथील परिसरात गेले दोन दिवस कुजकट वास येत होता. अखेर सोमवारी सकाळी हा कुजकट वास तीव्र स्वरुपात येऊ लागल्याने सीताराम नेवरेकर यांनी पडक्‍या विहिरीत डोकावून पाहिले असता बिबट्या असल्याचे लक्षात आले. नेवरेकर यांनी तत्काळ ही बाब येथील सामजिक कार्यकर्ते व ग्रा.पं सदस्य राजू पाटील यांना सांगितली. याची माहिती वन विभागाला मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी आले. यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्याला बाहेर काढण्यात आले.

हेही वाचा- गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर यंदा पहिलीचा प्रवेश ऑफलाईन अन् ऑनलाईनही

 बिबट्या भक्ष्याचा पाठलाग करत असताना विहिरीत पडला असावा, असा अंदाज वर्तविण्यात आला. वन विभागाच्या परिक्षेत्र वनाधिकारी प्रियांका लगड, वनपाल सुरेश उपरे, वनरक्षक एम. एच. गावडे, आकाश कडूकर, राहूल गुंठे, मिलिंद डाफळे, पोलिसपाटील, सामाजिक कार्यकर्ते सत्यवान विचारे आदी उपस्थित होते. पंचनामा करून तेथील परिसरात बिबट्याला अग्नी देण्यात आला. हा बिबट्या मादी जातीचा असून ३ वर्षे वाढीचा असल्याची माहिती वन विभागाने दिली.

संपादन-अर्चना बनगे