महावितरणच्या तारेने दुचाकीस्वाराचा बळी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

सावर्डे - मुंबई-गोवा महामार्गावर पिंपळा मोहल्ला फाट्यावर आज सकाळी साडेदहा वाजता अत्यंत दुर्दैवी पद्धतीने दुचाकीस्वाराचा अंत झाला. दुचाकीने जात असताना रस्त्यावर लोंबकळणाऱ्या महावितरणच्या वाहिनीने त्याचे धड व शिर वेगवेगळे झाले. मयूर मधुकर देवरूखकर (वय २६, रा. संगमेश्‍वर) असे मृताचे नाव आहे.

सावर्डे - मुंबई-गोवा महामार्गावर पिंपळा मोहल्ला फाट्यावर आज सकाळी साडेदहा वाजता अत्यंत दुर्दैवी पद्धतीने दुचाकीस्वाराचा अंत झाला. दुचाकीने जात असताना रस्त्यावर लोंबकळणाऱ्या महावितरणच्या वाहिनीने त्याचे धड व शिर वेगवेगळे झाले. मयूर मधुकर देवरूखकर (वय २६, रा. संगमेश्‍वर) असे मृताचे नाव आहे.

सकाळी साडेदहा वाजता मयूर दुचाकीवरून चिपळूणकडे जात होता. तो चिपळूण येथील के.टी.एम. शोरूममध्ये नोकरीला होता. त्याने पाच दिवसांपूर्वी नवी दुचाकी घेतली होती. तो सावर्डे येथील पिंपळा मोहल्ला फाट्यावर आला असताना चिपळूणकडून संगमेश्‍वरकडे जाणाऱ्या ट्रकला (एमएच ११ एम ५९७१) महावितरणच्या लोंबकळणाऱ्या तारांचे जाळे अडकले. काही तारा ट्रकला गुंडाळल्या. त्यातील एक तार महामार्गाच्या लगत असलेल्या शेवरीच्या झाडाला गुंडाळली गेली. यामुळे शेवरीचे झाड आणि ट्रक या दरम्यान तार जोरात ताणली गेली. त्याच वेळी तेथून जाणाऱ्या मयूरच्या ध्यानात ताणलेली तार आली नाही. ट्रकचालकालाही तार अडकलेली कळली नाही. ट्रक वेगाने जात होता व बाजूने मयूर चिपळूणकडे चालला असताना तो तारेवर अडकला व त्याचे शिर चिरले गेले. धडापासून १५ फुटावर पडलेले शिर पाहून अनेकांना चक्कर आली.

अभियांत्रिकी पदविका घेतलेला मयूर संगमेश्‍वर-चिपळूण असा नेहमीच प्रवास करीत असे. मधुकर देवरूखकर यांचा मयूर हा एकुलता एक मुलगा होता. अपघाताची बातमी सावर्डे बाजारपेठेत पोचताच लोकांनी महामार्गावर गर्दी केली. महामार्गावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मृतदेहातून वाहणारे रक्त, त्याच रक्तातून महामार्गावरची वर्दळ असल्यामुळे महामार्ग रक्ताने माखला होता. अपघातस्थळीचे दृश्‍य पाहणेही अनेकांना असह्य झाले.

अपघातात मृत ठरलेल्या युवकाची घटना दुर्दैवी आहे. प्रथमदर्शनी लोंबकळणाऱ्या तारेच्या जाळ्यातील एका तारेमुळे मयूरचा अंत झाला. या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून केली आहे. याचा तपास सुरू आहे. २४ तासाच्या आत या घटनेत महावितरणचा कर्मचारी दोषी आढळल्यास त्याच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करू.
- सचिन इंगोले, सहायक पोलिस निरीक्षक

Web Title: death in accident