डुकरासाठीच्या फासकीत अडकलेल्या बिबट्याचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जुलै 2019

लांजा -  तालुक्‍यातील बेनीखुर्द बौद्धवाडी येथे डुकरासाठी लावलेल्या फासकीत मादी बिबट्या अडकल्याची घटना सोमवारी घडली. वनखात्याने या बिबट्याला फासकीतून सोडविले खरे मात्र काही वेळातच हृदयविकाराच्या झटक्‍याने त्याचा मृत्यू झाला. 

लांजा -  तालुक्‍यातील बेनीखुर्द बौद्धवाडी येथे डुकरासाठी लावलेल्या फासकीत मादी बिबट्या अडकल्याची घटना सोमवारी घडली. वनखात्याने या बिबट्याला फासकीतून सोडविले खरे मात्र काही वेळातच हृदयविकाराच्या झटक्‍याने त्याचा मृत्यू झाला. 

तालुक्‍यातील बेनीखुर्द गावातील बौद्धवाडी येथील धनावडे नामक शेतकऱ्याच्या शेताजवळील कोंड्याच्या बेटामध्ये अज्ञात व्यक्तींनी डुकरासाठी फासकी लावली होती. सोमवारी पहाटेच्या सुमाराला बिबट्या फासकीत अडकला. फासकीतून सुटण्यासाठी त्याने जोरदार प्रयत्न केला. मात्र फासकी कोंडयाच्या बेटाला लावण्यात आल्याने त्याच्या धडपडीमध्ये फासकीची तार त्याच्या कमरेभोवती आवळली गेली होती. सोमवारी सकाळी बेनीखुर्द बौद्धवाडी येथील धनावडे गुरे घेऊन रानात जात असताना अचानकपणे गुरे उधळत असल्याचे त्याच्या लक्षात आले.

बिबट्या फासकीत अडकल्याचे त्यांच्या तेव्हा लक्षात आले. लांजा येथे वनखात्याला त्यानी माहिती दिली. दुपारी 2 वाजण्याच्या दरम्यान फासकी तोडून बिबट्याला पिंजराबंद करण्यात आले. 

उपविभागीय वनअधिकारी विजयराज सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वनअधिकारी प्रियांका लगड लांजा वनपाल पी. जी. पाटील, राजापूर वनपाल घाडगे, देवरूख वनपाल उपरे, वनरक्षक विक्रम कुंभार आदींसह अन्य वनकर्मचारी व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने फासकी तोडण्यात आली.

त्यानंतर उपचारासाठी बिबट्याला वनखात्याच्या शासकीय नर्सरीमध्ये उपचारासाठी आणण्यात आले. या ठिकाणी त्याच्यावर पशुवैद्यकीय अधिकारी कसालकर यांनी उपचार केले. त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्याच निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्यानंतर हृदयविकाराच्या झटक्‍याने दुपारी 3 वाजण्याच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Death of Leopard in Benikhurd in Lanja