सिंधुदुर्ग : मोबाईल टॉवरवरून भाजप - शिवसेनेत रंगला श्रेयवाद 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

मुळात बुधवारपासून इंटरनेट सेवा सुरू झाली होती; मात्र थ्रीजी ऐवजी टुजी सेवा मिळत असल्याने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन थ्रीजी सेवा देण्याची मागणी केली.

सावंतवाडी - बीएसएनएल टॉवरचे बंद असलेले थ्रीजी नेटवर्क सुरू करण्यावरुन कोलगाव येथे भाजप व शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये श्रेयवाद रंगला. शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा यांनी हे नेटवर्क मी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे सुरू झाल्याचे सांगितले तर भाजप तालुकाध्यक्ष महेश सारंग यांनी आपल्या प्रयत्नातून हा प्रश्‍न सुटल्याचे सांगितले. एकूणच टॉवरवरून कोलगावमध्ये वेगळेच राजकारण रंगले आहे. 

येथील भोमवाडी येथे बीएसएनएलकडून बसविण्यात आलेला मोबाईल टॉवरचे इंटरनेट नेटवर्क वारंवार बंद पडत असल्यामुळे 
ग्रामस्थांमध्ये नाराजी होती. आठ दिवसांपासून ही समस्या तीव्र झाली होती. दरम्यान, भाजपचे तालुकाध्यक्ष सारंग यांनी याबाबत दूरसंचार जिल्हा प्रंबधक ज्ञानेश्‍वर महापुरूष यांची भेट घेऊन तत्काळ कार्यवाही करण्याची मागणी केली होती.

अखेर आज शिवसेनेचे कोलगाव जिल्हा परिषद सदस्य डिसोझा यांनी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, पंचायत समिती सदस्य मेघःशाम काजरेकर, संदीप घोगळे, पप्पू ठिकार यांनी महापुरूष यांची भेट घेतली व थ्रीजी सेवा सुरू करण्याची मागणी केली.

मुळात बुधवारपासून इंटरनेट सेवा सुरू झाली होती; मात्र थ्रीजी ऐवजी टुजी सेवा मिळत असल्याने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन थ्रीजी सेवा देण्याची मागणी केली. यावेळी महापुरुष यांनी थ्रीजी नेटवर्क सिस्टीमचा सर्वर हा मुंबई येथे असल्याने तो अपडेट होण्यास विलंब होत असल्याचे सांगितले. जनरेटर उपलब्ध नसल्यामुळे समस्या निर्माण झाल्या आहेत. तात्पुरती पर्यायी व्यवस्था करून हा प्रश्‍न सोडवण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे यांनी सांगितले. 

दोघांचीही मते अशी... 

याबाबत डिसोझा यांना विचारले असता ते म्हणाले, ""इंटरनेटच्या समस्येबाबत सतत पाठपुरावा होता. मी दिखावा केला नाही. याबाबत सारंग यांना विचारले असता ते म्हणाले, ""थ्रीजी सेवा ही सकाळी सुरू झाली आणि शिवसेनेकडून दिखावा म्हणून दुपारी जिल्हा प्रंबधकांना जाब विचारण्यात आला. प्रश्‍न सुटल्यावर जाब विचारुन उपयोग काय? माझ्या प्रयत्नातून हा प्रश्‍न निकाली लागला आहे.''  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Debate in BJP - ShivSena on Mobile Tower in Kolgaon Sindhudurg