रत्नागिरीकरांना दिलासा ; कोरोना रूग्ण संखेत घट 

राजेश कळंबटे
Thursday, 24 September 2020

रुग्ण वेळेत दाखल होत नसल्यामुळे मृत्यू वाढत असल्याचे आरोग्य विभागाचे मत आहे.

रत्नागिरी - कोरोना बाधित सापडण्याचा वेग मंदावला असून मागील चोविस तासात अवघे 51 रुग्ण बाधित सापडले. हा रत्नागिरीकरांसाठी दिलासा असला तरी गेल्या दोन दिवसात सहा जणांचा मृत्यू ही चिंताजनक बाब आहे. मृतांचा टक्का 0.1 टक्केने वाढला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधितांची संख्या 6,954 झाली असून 237 मृत आहेत.

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार आरटीपीआर चाचणीत 19 तर अ‍ॅण्टीजेनमध्ये 32 रुग्ण बाधित आले. त्यात रत्नागिरी तालुक्यात 9 तर चिपळूण तालुक्यात 7 रुग्ण सापडले. मंडणगड, दापोली व संगमेश्‍वर तालुक्यात एकही बाधित आढळलेला नाही. उर्वरित तालुक्यात खेड 1, गुहागर 11, लांजा 6, राजापूर 7 रुग्ण बाधित आहेत. आतापर्यंत पॉझिटीव्ह रुग्णांचा आकडा गेल्या पाच दिवसात कमी झाला असून जिल्ह्यात एकूण बाधित 6,954 आहेत. सर्वाधित रुग्ण रत्नागिरी आणि चिपळूण तालुक्यात सापडत होते. परंतु, गेल्या चार दिवसात या दोन्ही तालुक्यात दोन आकडी रुग्णही बाधित झालेले नाहीत.

नवीन रुग्णांची संख्या घटलेली आहे; परंतु मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात एकूण मृतांचा आकडा 237 झाला आहे. गुरुवारी (ता. 24) दोघांचा मृत्यू झाला असून बुधवारी (23) चार जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये संगमेश्‍वर, रत्नागिरीतील प्रत्येकी एक तर चिपळूण, खेडमधील प्रत्येकी दोन रुग्णांचा समावेश आहे. कालपर्यंत मृत्यूदर 3.30 टक्के होता. तो 3.40 टक्के झाला आहे. ही आरोग्य विभागाची चिंता वाढणारी गोष्ट आहे. 

रुग्ण वेळेत दाखल होत नसल्यामुळे मृत्यू वाढत असल्याचे आरोग्य विभागाचे मत आहे. चिपळूण, रत्नागिरी तालुक्यापाठोपाठ खेडमध्येही मृतांचा आकडा वाढू लागला आहे. आतापर्यंत 41 रुग्ण कोरोनाने मृत झाले आहेत.

दरम्यान, रत्नागिरी तालुक्यात रुग्ण सापडण्याचा वेग कमी झाला आहे. नवीन अहवालात दीड महिन्यांच्या एका बाळासह आई कोरोना पॉझिटिव्ह आली. त्याशिवाय कसोपमधील एका शंभर वर्षीय आजोबा बाधित झाले. तसेच गयाळवाडी 1, साखरपा 1, कारवांचीवाडी येथे 3, हिंदू कॉलनी 1, मारुती मंदिर 2, टीआरपी 2, कसोप 1, साळवी स्टॉप 2 आणि एका खासगी कार्यालयातील कर्मचारी बाधित आहे. रत्नागिरी पालिकेतही कोरोनाने शिरकाव केला असून एक प्रमुख लोकप्रतिनिधी बाधित झाला.

हे पण वाचावारंवार येणाऱ्या वादळांमुळे मच्छीमारांची फरफट

 पालिकेचे कामकाज दोन दिवस बंद ठेवले जाणार असून सर्व कर्मचार्‍यांची कोरोना चाचणी केली जाईल असे मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांनी सांगितले.

हे पण वाचापडद्यामागील माणसांसाठी धावली पडद्यावरील माणूसकी

संपादन - धनाजी सुर्वे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: decreased corona patients in ratnagiri district