मोती तलावाची पाणी पातळी घटतेय

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 मार्च 2017

सावंतवाडी - शहरातील विहिरीतील पाण्याची पातळी कायम ठेवण्यास महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मोती तलावातील पाण्याची पातळी फेब्रुवारीच्या अखेरीसच कमी होऊ लागली आहे. त्यामुळे उन्हाळ्यात शहरातील विहिरी कोरड्या पडण्याची भीती नागरिकांतून व्यक्त होत आहे. इतक्‍या लवकर तलावाची पातळी घटायला सुरवात होण्याचा गेल्या काही वर्षांतला हा पहिलाच प्रकार असल्याचे सांगितले जात आहे. 

शहर डोंगराळ भागाच्या खाली असल्याने पाण्याच्या पातळीत सहसा घट होत नाही; मात्र यावर्षीची परिस्थिती लक्षात घेता आताच पाणी खाली जात असल्याने भविष्यात धोक्‍याची घंटा आहे, असे जाणकारांचे मत आहे. शहराला पालिकेच्या पाळणेकोंड आणि केसरी-फणसवडे या दोन नळपाणी योजनेतून पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यामुळे आजपर्यंत शहरात कधी पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवलेले नाही. दुसरीकडे अनेक नागरिकांच्या दारात नळ असले तरी घरासमोर असलेल्या विहिरीचे पाणी वापरले जाते. त्यामुळे त्याचा फायदा येथील नागरिकांना होतो. नळयोजनेचा वापरही यामुळे मर्यादित स्वरूपात करता येतो. सद्यःस्थितीत शहरातील वातावरणात झालेले बदल लक्षात घेता रात्री थंडी, पहाटे धुके आणि दुपारी कडक ऊन असा विचित्र प्रवास सुरू आहे. त्याचा फटका नागरिकांना बसण्याची शक्‍यता आहे.

एप्रिलअखेरची स्थिती आताच
सुमारे २५ टक्के नागरिक आजही आपल्या दारात असलेल्या विहिरीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. मोती तलावात मोठ्या प्रमाणात पाणी असल्यानंतर मार्च अखेरपर्यंत शहरातील विहिरीत पाण्याची वानवा कधीच जाणवत नाही. त्यामुळे त्याचा फायदा नागरिकांना होतो. सद्यःस्थिती लक्षात घेता मोती तलावातील पाण्याची पातळी कमालीची घटली आहे. यापूर्वी एप्रिलअखेरपर्यंत एवढे पाणी कमी झाल्याचे चित्र नव्हते; मात्र काही दिवसांपूर्वी तलावाचा काठ एका बाजूने कोरडा दिसत आहे. त्यामुळे ही पाण्याची कमी होणारी पातळी लक्षात घेता भविष्यात शहरातील विहिरी कोरड्या पडण्याची भीती व्यक्त होत आहे.

Web Title: Decreasing water level of the moti lake

टॅग्स