#FormalinCase गोव्याशी संबंध बिघडू देणार नाही - दीपक केसरकर

#FormalinCase गोव्याशी संबंध बिघडू देणार नाही - दीपक केसरकर

सावंतवाडी - एखाद्या मंत्र्याचा निर्णय दोन राज्याचे संबंध बिघडतील असा ठरू नये, सिंधुदुर्ग आणि गोव्यातील संबंध बिघडू देणार नाही आणि कोणाच्या मर्जीवर अवलंबून राहणार नाही अशी भूमिका पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचे नाव न घेता मांडली.

गोवा बांबुळी येथील रुग्णालयात आरोग्य संदर्भात घेण्यात आलेल निर्णय आणि फार्मेलिन वरून उठलेल्या वादानंतर इन्सुलेटेड वाहनांचा निर्णय याबाबत लवकरच तोडगा काढण्यात येणार आहे. त्यासाठी गोव्यातील मंत्र्यांचे आपण चर्चा करू असेही केसरकर यांनी सांगितले. श्री केसरकर यांनी आज येथे आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली.

यावेळी ते म्हणाले, ""फार्मेलीन व आरोग्य प्रश्नावरून घेण्यात आलेला निर्णय हा योग्य असे म्हणता येणार नाही. परंतु एखाद्या मंत्राचा निर्णय दोन संबंध बिघडतील असा ठरू नये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पन्नास हजारहुन अधिक युवक-युवती गोव्यात काम करतात येथील नातीगोती संबंध दोन्ही ठिकाणी आहेत त्यामुळे अश्‍या काही निर्णयामुळे वितुष्ट येणार नाही याची जबाबदारी नक्कीच घेण्यात येणार आहे. यापूर्वी गोव्यात प्रवेश कर आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु मी विनंती केल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याला त्यातून वगळण्यात आले होते. तसाच काहीसा निर्णय आता होईल, असा मला विश्वास आहे.''

मच्छीमारांना इन्सुलेटेड वाहने देण्याबाबत आमचे प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे गोवा बांबोळी येथे आरोग्य सेवा मोफत मिळावीत यासाठी तयार करण्यात आलेली योजना अंतिम टप्प्यात आहे. लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.

- दीपक केसरकर

शिल्पग्राम, हेल्थफार्मच्या निकृष्ठ कामांची होणार चाैकशी 

सावंतवाडी पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी शिल्पग्राम, उद्यान आणि हेल्थफार्म आदी प्रकल्पांची कामे महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्या कडून केली जात आहेत; मात्र ही कामे निकृष्ठ आहेत असा आरोप केला होता. यावर केसरकर म्हणाले, ""तसे असेल तर त्या कामाची चौकशी केली जाईल. पालिकेच्या वतीने त्या कामावर नजर ठेवण्याच्या सूचना केल्या जातील. त्यामुळे हे काम योग्य पद्धतीने होईल.''

वाळू आयातीचा विचार

जिल्ह्यातील वाळू प्रश्नावर केसरकर म्हणाले, ""निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू आहेत. परंतु वाळू आयात करता येऊ शकते का याबाबत विचार सुरू आहे. गोव्या सह अन्य ठिकाणी इम्पोर्टेड वाळू आयात केली जाते. त्याला चांगली मागणी आहे. त्यामुळे अशा प्रकारची वाळू आयात करता येऊ शकते का याबाबत विचार सुरू आहे. तहसीलदार इमारतीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. फर्निचरच्या कामासाठी वेळ लागू नये, यासाठी तयार असलेले फर्निचर घेऊन लवकरात लवकर कार्यालयात सुरू करण्याच्या सूचना तहसीलदारांना देण्यात आल्या आहेत.''

त्या गुन्ह्याबाबत चौकशीनंतर निर्णय 
दोडामार्ग तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत ते म्हणाले, ""सामाजिक प्रश्नावरून अशाप्रकारे गुन्हे दाखल होऊ नयेत. हा प्रकार नेमका गैरसमजातून घडला आहे की खरच काही आहे याची चौकशी होणे गरजेचे आहे. अधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांची व पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांची सौजन्याने बोलणे गरजेचे आहे. अधिकाऱ्यांनी आपला अधिकाराचा वापर करणे गरजेचे आहे. या प्रकरणाची चौकशी पोलिसांकडून केली जाईल. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल.''  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com