‘स्कुबा’चा परवाना आता जिल्हा मुख्यालयात - केसरकर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 डिसेंबर 2018

वेंगुर्ले - स्कुबा डायव्हिंग व वॉर्टर स्पोर्टस्‌साठीचे अधिकृत परवाने आता जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मिळणार आहेत. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केल्याची माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी शिरोडा येथे दिली.

वेंगुर्ले - स्कुबा डायव्हिंग व वॉर्टर स्पोर्टस्‌साठीचे अधिकृत परवाने आता जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मिळणार आहेत. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केल्याची माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी शिरोडा येथे दिली.

शिरोडा येथील वेळागर समुद्रात आता पर्यटकांना स्कुबा डायव्हिंग व स्नॉर्कलिंगचा आनंद अनुभवता येणार आहे. राजेश नाईक या तरुणाने या व्यवसायात पाऊल टाकले असून, या उपक्रमाचे उद्‌घाटन पालकमंत्री केसरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

वाळू शिल्प म्युझियमचा लवकरच प्रारंभ
शिरोड्यातील पर्यटनवाढीसाठी देवगडमधील व्हॅक्‍स म्युझियमप्रमाणेच शिरोडा येथे वाळू शिल्प म्युझियम ही संकल्पना शिरोडा ग्रामपंचायत राबवत आहे. लवकरच याठिकाणी त्याचा प्रारंभ करण्यात येईल, असे यावेळी शिरोडा सरपंच मनोज उगवेकर यांनी सांगितले.

पालकमंत्री केसरकर म्हणाले, ‘‘स्कुबा डायव्हिंग व वॉर्टर स्पोर्टस्‌साठीची परनवानगी व लायन्स देण्यास विलंब होतो. त्यामुळे अधिकृत परवाने आता जिल्हास्तरावर मिळणार आहेत. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीद्वारे लायसन्स दिली जातील.’’

ते पुढे म्हणाले, ‘‘वेंगुर्ले येथे येत्या वर्षभरात नवीन बॅटरी ऑपरेटेड पाणबुडीचा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे. याठिकाणी स्कुबा डायव्हिंग ट्रेनिंग सेंटर उभारण्यात येणार आहे. यामुळे लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल. कोकण ग्रामीण पर्यटन मधून या ट्रेनिंगची सोय व याचा खर्चही शासनाकडून करण्यात येणार आहे. यामुळे जास्तीत जास्त युवकांनी समोर येऊन हे ट्रेनिंग घेऊन स्वतःचे उद्योग सुरू करावेत.’’

‘‘मोठ्या पर्यटकांचा ओघ लक्षात घेता एकाच दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन महोत्सव न होता शिरोडापासून ते विजयदुर्गपर्यंत वर्षभरात हे पर्यटन महोत्सव घेण्यात यावेत. यासाठी तीन दिवसांच्या महोत्सवाला ३ लाख तर ५ दिवसांच्या महोत्सवाला ५ लाख अशाप्रमाणे निधीची तरतूद करण्यात आली आहे.’’

- दीपक केसरकर

प्रास्ताविक प्रमोद नाईक, तर मान्यवरांचे स्वागत राजेश नाईक यांनी केले.

यावेळी पंचायत समिती सभापती सुनील मोरजकर, शिरोडा सरपंच मनोज उगवेकर, जिल्हा परिषद सदस्य राजन मुळीक, पंचायत समिती सदस्य सिद्धेश परब, शिवसेना उपजिल्हा अधिकारी सागर नाणोस्कर, उपसरपंच रवी पेडणेकर, वेंगुर्ले माजी उपनगराध्यक्ष रमण वायंगणकर, जिल्हा बॅंक संचालक राजन गावडे, ग्रामपंचायत सदस्य प्राची नाईक, महेश्‍वरी राऊळ, आजू आमरे, दिलीप गावडे, श्री. फोडणाईक तसेच कौशिक परब, नितीन मांजरेकर, आरवली सरपंच सौ. राणे, रोहित पडवळ आदी उपस्थित होते.

Web Title: Deepak Kesarkar comment