आंबोली, गेळेचा लवकरच सॅटेलाइट सर्व्हे - केसरकर

आंबोली, गेळेचा लवकरच सॅटेलाइट सर्व्हे - केसरकर

सावंतवाडी - आंबोली-गेळे येथील कबुलायतदार गावकर प्रश्‍न सुटावा, यासाठी त्या गावाचा लवकरच सॅटेलाइटद्वारे सर्व्हे केला जाणार आहे. यात कोणाची मध्यस्थी नको. ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करूनच शासनाने हा निर्णय घेतला आहे, अशी भूमिका पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेतून मांडली.

मळगाव येथे ज्या लॉजमध्ये बलात्कार झाला, त्या लॉजशी आमदार वैभव नाईक यांचा कोणताही संबंध नसल्याचे सांगत मंत्री केसरकर यांनी त्यांना क्‍लीन चिट दिली.

ते म्हणाले, ‘‘मळगाव येथील सामूहिक अत्याचार प्रकरणाची चार्जशीट लवकरच न्यायालयात दाखल करण्यात येऊन आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा होण्यासाठी प्रयत्न आहे; मात्र विरोधकांकडून खोटी माहिती देऊन लोकांची दिशाभूल केली जास्त आहे. ‘ते’ लॉज हे भूषण मधुकर परुळेकर यांच्या मालकीचे आहे. ही इमारत नाईक यांच्या वडिलांच्या नावावर होती; मात्र पाच वर्षांपूर्वी इमारत विकली गेली; परंतु मधल्या काळात वडिलांचे निधन झाल्याने काही कागदपत्रे अपुरी राहिली आहेत; मात्र ज्या लॉजवर हा प्रकार घडला, ‘त्या’ लॉजचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव पाठविला आहे.’’

अलीकडे पावसाने दडी मारल्याने भातशेतीच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्याचे आदेश कृषी विभागाला दिले आहेत. चिपी विमानतळासाठी आवश्‍यक वीज नेण्यासाठी बांधकाम विभागाच्या रस्त्यावर पोल टाकण्यात येतील व जेथे दाट रस्ते आहेत, तेथे केबल टाकण्यात येणार आहे, असे केसरकर यांनी सांगितले.

पर्यटनाबाबत आमदार प्रसाद लाड यांनी केलेल्या टीकेबाबत त्यांना विचारले असता केसरकर म्हणाले, ‘‘मी विकासकामाची जाहिरात करत नाही; मात्र लोकसंख्येच्या तुलनेत जेवढा निधी या जिल्ह्यात आणला, तेवढा निधी बाकीच्या राज्यात मिळाला काय, याची माहिती प्रसाद लाड यांनी घ्यावी व बोलावे.  भविष्यात दर्जेदार कामे जिल्ह्यात होणार आहेत. रस्ते, पाणी, वीज यांवर भर दिला आहे. लोकांसाठी विविध योजना शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. यामध्ये कुक्कुटपालन, गीर गाई आदी योजना आहेत. याचा लाभ घ्यावा.’’

अत्याचारित मुलीला दहा लाखांची मदत 
मळगाव येथील अत्याचार प्रकरणातील युवतीची ओळख पसरू नये, यासाठी पोलिस प्रशासन काळजी घेत आहे. युवतीला न्याय मिळावा यासाठी हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्यात येणार असून मनोधैर्य प्रस्तावाच्या माध्यमातून युवतीला टप्प्याटप्याने दहा लाखांची मदत मिळवून देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे केसरकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com