मालमत्ता विकून राजकारण करतोय- दीपक केसरकर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जानेवारी 2017

जिल्ह्यासाठी विशेष आराखडा तयार केला असून, त्यासाठी कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. आता जिल्ह्यात कधी न आला एवढा निधी येत्या 2 वर्षांत येणार आहे. ज्यांच्यामुळे मी मंत्री होऊ शकलो, ते बाळासाहेब ठाकरे व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नेहमी सांगत असत की जे प्रेम कोकणाने दिले ते कोणी दिले नाही. या भागात कोकमची मोठ्या प्रमाणात लागवड होते. कोकम लागवाडीचा वेगळा कार्यक्रम चांदा ते बांदाअंतर्गत सुरू आहे. नारळाच्या सोडणांपासून दोरी बनविणे अशा उपक्रमातून उत्पन्न वाढवून रोजगार उपलब्ध होईल याच्या प्रयत्नासाठी मी कटिबद्ध आहे. जिल्ह्यात 25 कोटी रुपयांची राईस मिल येत्या काही काळात सुरू होईल. त्यामुळे सोसायटीमधील भात अन्य ठिकाणी नेण्याचा प्रश्‍न सुटणार आहे.
- दीपक केसरकर, पालकमंत्री

सावंतवाडी- मी दुसऱ्यांच्या पैशावर राजकारण करत नाही, माझी मालमत्ता विकून मी राजकारण करतो. आतापर्यंत आलेल्या राजकर्त्यांनी किती पैसे मिळणार आणि किती मोठा होणार याचा विचार केला; पण मी त्यातला नाही, असे वक्तव्य पालकमंत्री तथा राज्याचे गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आरोस येथे केले.

आरोस येथे ग्राम सचिवालयाच्या इमारतीचे भूमिपूजन झाले. या वेळी श्री. केसरकर बोलत होते. शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, संपर्कप्रमुख राजू नाईक, पंचायत समिती सदस्य लाडोबा केरकर, सार्वजनिक बांधकाम अभियंता अनामिका चव्हाण, मळेवाड विभागप्रमुख गुरुनाथ नाईक, आरोस सरपंच साक्षी नाइक, उपसरपंच दत्तगुरू दळवी, ग्रामसेवक अंकुश आरोसकर, माजी सरपंच वामन कुबल, अश्‍विनी नाईक, संचिता पेडणेकर आदी उपस्थित होते.

श्री. केसरकर म्हणाले, ""माझ्यासारखा कार्यकर्ता मंत्री होतो. नुसतेच मंत्री म्हणून कामकाज पाहण्यापेक्षा जनतेचे हित कसे होईल, हे पाहावे लागते. मी इथे पोचू शकलो नाही, कारण योजना आणत असताना भारतभर फिरावे लागते, तरी पण कुठल्या गावाचा रस्ता खराब झाला याची माहिती माझ्याकडे असते. वर्षाला हजार कोटी रुपये येतात. त्याचा उपयोग तुमच्यासाठीच व्हायला पाहिजे. जिल्हा सशक्त बनविण्याची ताकद युवा व महिलांत येणे आवश्‍यक आहे.''

या वेळी शिवसेना संपर्कप्रमुख राजू नाईक यांनीही मनोगत व्यक्त केले. मोहन पालेकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. गजानन परब यांनी प्रास्ताविक केले. या वेळी बाबल परब, फटी नाईक, अनिल सावंत, चंद्रा नाईक, गुरू आरोसकर, संतोष जाधव उपस्थित होते.

Web Title: Deepak kesarkar statement on Politics and property