सभापतिपदी सेनेकडून दीपाली पवार? 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 मार्च 2017

चिपळूण - पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला प्रत्येकी 9 जागा मिळाल्या आहेत. समान जागा असल्याने चिठ्ठी टाकून सभापती निवडणूक होणार आहे. नशिबाचे दान कोणाच्या पारड्यात पडणार याची तालुकावासीयांना उत्सुकता आहे. सेनेकडून सभापतीसाठी दीपाली पवार, गटनेते पदासाठी राकेश शिंदे व उपसभापती पदासाठी प्रताप शिंदे यांची नावे निश्‍चित झाल्याची चर्चा आहे. 

पंचायत समितीची अटीतटीची निवडणूक झाली. गतनिवडणुकीत सात सदस्य असलेल्या शिवसेना सदस्यांची संख्या या निवडणुकीत नऊवर पोचली. राष्ट्रवादीच्या सदस्य संख्येत काहीच बदल झालेला नाही. येत्या काही दिवसांत सभापती निवडणुकीचा कार्यक्रम प्रसिद्ध होण्याची शक्‍यता आहे. यासाठी शिवसेनेकडून मोर्चेबांधणी करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या सेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सभापती निवडीबाबत चर्चा झाली. सेनेकडून सभापती पदासाठी टेरव गणाच्या सदस्या दीपाली पवार यांचे नाव आघाडीवर आहे. तसेच ओवळी गणातील सदस्या धनश्री शिंदे यांच्या नावाचीही सभापतिपदासाठी चर्चा आहे. गंगाराम पवार हे ज्येष्ठ शिवसैनिक असल्याने सौ. पवार यांना संधी देण्यात आल्याचे बोलले जाते. गटनेते पदासाठी युवानेते राकेश शिंदे यांचे नाव निश्‍चित झाले आहे. राकेश शिंदे यांनी नांदिवसे गणात राष्ट्रवादीच्या माजी सभापतींचा पराभव करीत मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. अभ्यासू कार्यकर्ता म्हणूनही त्यांची ओळख असल्याने गटनेते पदासाठी राकेश शिंदेंचे नाव निश्‍चित झाल्याची चर्चा आहे. उपसभापतिपदासाठी प्रताप शिंदे यांना संधी मिळण्याची शक्‍यता आहे. सेना, राष्ट्रवादीस स्पष्ट बहुमत नाही. त्यामुळे चिठ्ठी टाकून नशीब आजमावण्यात येणार आहे. या पंचायत समिती निवडणुकीत सेनेतून नव्या चेहऱ्यांनाच संधी मिळाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येही नंदकिशोर शिर्के, पांडुरंग माळी वगळता सात नव्या चेहऱ्यांनी पंचायत समितीत प्रवेश केला आहे. दोन्ही पक्षात युवा कार्यकर्ते व महिला सदस्यांची संख्या अधिक आहे. समान सदस्य संख्या असल्याने पंचायत समितीत दोन्ही पक्षात अधिक कलगीतुरा रंगण्याची शक्‍यता आहे. 

Web Title: Deepali pawar shiv sena